Mumbai High ALert : मोहम्मद पैगंबर यांच्या तथाकथित वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण देशात तणाव वाढत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अल-कायदा (AQIS) ने देशातील अनेक शहरांमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. अल कायदाबाबत महाराष्ट्र हाय अलर्टवर आहे.
मुंबईत दहशतवादी कटाचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी षड्यंत्राचा इशारा देण्यात आला आहे. कानपूरच्या धर्तीवर काही समाजकंटक दगडफेकीचा कट रचू शकतात. याला गांभीर्याने घेत महाराष्ट्र सरकारने दगड-बॉटल हल्ल्याच्या शक्यतेवर संवेदनशील भागांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृह मंत्रालय लवकरच बैठक घेणार असून, त्यात राज्यातील उच्च पोलीस अधिकारी आणि मंत्रालयाच्या सचिवांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.
अल-कायदाच्या धमकीनंतर सरकार सतर्क
AQIS ने 6 जून रोजी एक धमकीचे पत्र जारी केले होते, ज्यात म्हटले होते की ते दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करतील. या धमकीनंतर सर्व राज्ये हाय अलर्टवर आहेत. भगव्या दहशतवाद्यांनी आता दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमध्ये त्यांचा अंत होण्याची वाट पाहावी, असे या पत्रात म्हटले आहे. अल-कायदाने विशिष्ट शहरांची नावे देऊन धमक्या देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
केंद्रीय यंत्रणा लक्ष ठेवून
केंद्रीय एजन्सींनी धमकीच्या पत्राची पडताळणी केल्यानंतर सर्व संबंधित राज्य पोलीस दलांना हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर अनेक दहशतवादी संघटनांनी धमकीची पत्रे जारी केली आहेत. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुस्लीम देशांमधूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी धमक्या येत असल्याने नुपूर शर्माला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.