Positive News : मुंबईत कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारांसाठी आता आणखी एक नवा यशस्वी प्रयोग 

Updated: Jul 12, 2021, 05:54 PM IST
Positive News : मुंबईत कॉकटेल अँटीबॉडीजचा प्रयोग यशस्वी title=

मुंबई : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्या कॉकटेल अँटीबॉटीजनं ( cocktail antibodies ) उपचार झाले. त्याचा प्रयोग मुंबईत देखील यशस्वी झाला आहे. कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन अँटीबॉडी औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग मुंबईच्या सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात २०० पेक्षा अधिक रुग्‍णांवर बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या ( BMC ) वतीने करण्यात आला होता.

मिश्रि‍त औषधोपचारानंतर ऑक्‍स‍िजनची गरज भासलेल्‍या रुग्‍णांचे प्रमाण अवघे ०.५ टक्‍के तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल ७० टक्‍के घट पाहायला मिळाली. रुग्‍णालयातील १३ ते १४ दिवस उपचारांचा कालावधी घटून ५ ते ६ दिवसांवर आला. तसेच रेमडेसिव्‍हीर सारखी इतर औषधे, स्‍टेरॉईड आदींचा वापर टळल्‍याने साईड इफेक्‍टस् कमी झाले

संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या ( Corona Third Wave ) पार्श्‍वभूमीवर या औषध मिश्रणाचा यशस्‍वी प्रयोग दिलासा देणारा आहे. 

कोविडबाधितांवर उपचारांसाठी अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर २०२० पासून कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोविड बाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्‍यात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली.

ज्‍यांचे वय १२ वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन ४० किलोपेक्षा जास्‍त आहे अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. सौम्‍य ते मध्‍यम (mild to moderate) स्‍वरुपात ज्‍यांना कोविडची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्‍य होते.