मुंबई : शिवसेना आणि भाजपमधला वाद नाणारच्या पार्श्वभूमीवर आता आणखी टोकाला गेलाय. तुमच्या डोक्यात मस्तीची भांग चढली असेल तर प्रकल्प रेटून दाखवा असं खुलं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात आलीय.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सुभाष देसाईंनी काल केलेली अधिसूचना रद्द करण्याची घोषणा त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. शिवाय मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलंय. नाणारचा प्रकल्प रद्द करण्यावरून सुरू झालेला शिवसेना-भाजपमधला संघर्ष आता श्रेयवादापर्यंत जाऊन पोहचलाय.
शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जमीन अधीग्रहणाची अधीसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा केला असला तरी मुख्यमंत्र्यांनीही जनहित लक्षात घेऊन निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतलीय. मुळात आता नाणार रद्द करण्याशिवाय मुख्यमंत्र्यांसमोरही पर्याय नाही. मात्र रद्द करण्याचं संपूर्ण श्रेय शिवसेनेला जाऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा सध्यातरी ताणून धरलेला दिसतोय. नियम आणि कायदे लक्षाच घेऊनच निर्णय घेतल्याचं सुभाष देसाईचं म्हणणं आहे. तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात पत्र दिलेलं असून त्यासंदर्भात कोकणाचं हित लक्षात घेऊनच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय.