मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद /आजारी गिरण्यांमधील कामगार व त्यांच्या वारसांसाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता १४ सप्टेंबरपासून आयोजित विशेष अभियानास अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे यापुढे 4 ऑक्टोबरपासून हे अभियान म्हाडा कार्यालयाजवळील समाज मंदिर हॉल, एम.आय.जी क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
गिरणी कामगार/वारसांच्या पात्रता निश्चितीसाठी गिरणीमध्ये काम केल्याबाबत विहित केलेल्या १३ पैकी जास्तीत जास्त कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्यांना ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. http://millworkereligibility.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा mill worker eligibility या मोबाईल ॲपद्वारे अपलोड केले असल्यास त्यांना प्रत्यक्ष येऊन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. तसेच ज्या गिरणी कामगार/वारसांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन कागदपत्रे सादर करायची आहेत, त्यांनी समाज मंदिर हॉल, एम.आय.जी क्रिकेट ग्राउंडसमोर, गांधीनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत कागदपत्रे जमा करावेत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. ऑनलाइन सुविधेअंतर्गत अद्यापपर्यंत ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत.
मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सर्व संबंधित गिरणी कामगार/ वारसांना आवाहन केले आहे की, म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ http://millworkereligibility.mhada.gov.in वर कागदपत्रे अपलोड करण्याच्या सुविधेचा लाभ घेत या अभियानात अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी सहभाग घ्यावा. मिलिंद बोरीकर यांनी कळविले आहे की, ०१,५०,४८४ गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे व त्याकरिता शासन प्रयत्नशील आहे. पात्रता निश्चितीचे विशेष अभियान याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
या अभियानात सहभागासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून गिरणी कामगार व त्यांचे वारस म्हाडा मुख्यालयात येत आहेत. परंतु, कागदपत्रे सोईनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन यापैकी कोणत्याही एका प्रकारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध गिरणी कामगार यांना घेऊन प्रवास करत म्हाडा कार्यालयात येण्यापेक्षा कागदपत्र सादर करण्याकरिता ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बोरीकर यांनी केले आहे.
कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक अर्जदारांपर्यंत पोहोचण्याकरिता व गिरणी कामगार/ वारसांच्या सोयीकरिता मंडळातर्फे एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली (IHLMS 2.0) या संगणकीय आज्ञावलीच्या सहाय्याने गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेकरिता स्वतंत्र ॲप विकसित केले आहे. हे ॲप अर्जदार आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतील. अण्ड्रोइड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि आयोएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये mill workers eligibility या नावाने उपलब्ध आहे. या माध्यमातून गिरणी कामगार/ वारस अर्जदार कधीही आणि कुठूनही आपली कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करू शकतील.
या ॲपबाबत माहिती देण्याकरिता सर्व गिरणी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींकरिता मंडळातर्फे सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असल्याने संबंधित गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील संपर्क करावा. या विशेष अभियानादरम्यान ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने प्राप्त कागदपत्रे कामगार विभागाच्या अधिकार्यांकडे गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेकरिता पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने संगणकीय प्रणालीमध्ये जमा कागदपत्रांची पात्रता निश्चिती तुलनात्मकदृष्ट्या लवकर निश्चित होत असल्याचे श्री. मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.
सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन आपली पात्रता निश्चिती करून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे दर्शविण्यात आलेल्या क्यु आर कोडच्या सहाय्याने गिरणी कामगार व त्यांचे वारस थेट संगणकीय प्रणालीशी जोडले जाऊ शकतात.
गिरणी कामगार / वारसांनी खालीलपैकी जास्तीत जास्त कागदपत्रे सादर करावीत
१) गिरणी कामगारांचे ओळख पत्र ,
२) तिकीट नंबरची प्रत,
३) सर्विस प्रमाणपत्र ,
४) लाल पास,
५) प्रोव्हिडेंट फंड क्रमांक,
६) इ एस आय सी क्रमांक,
७) मिल प्रमाणपत्र प्रत,
८) हजेरी पत्र ,
९) लीव्ह रजिस्टर प्रत,
१०) उपदान प्रदान आदेश ,
११) भविष्य निर्वाह निधि सेटलमेंट आदेशाची प्रत,
१२) पगार पावती ,
१३) आधार कार्ड आणि इतर तत्सम कागदपत्र.