प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : हौसेला मोल नसतं असे नेहमी म्हणतात. पण वसईत (Vasai) एका वाढदिवसानिमित्त (Birthday) याची प्रचिती आली आहे. वसईत पूर्वेच्या कामण गावात राहणारे नवीन भोईर यांनी आपला मुलगा रेयांश याचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. या वाढदिवसाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. मोठ्या धुमधडाक्यात हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. आयुष्यभरासाठी लक्षात राहावा असा मुलाचा वाढदिवस नवीन भोईर यांनी साजरा केला आहे.
नवीन भोईर यांचा मुलगा रेयांश याचा शनिवारी दुसरा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्यांनी रेयांशला आवडत असलेल्या ह्युंदाई व्हेरेना कारची प्रतिकृती असलेला चक्क 221 किलोचा केक आणला होता. या केकची किंमत तीन लाखाच्या आसपास असल्याची माहिती मिळत आहे. रेयाशंच्या वाढदिवसाचा केक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एखाद्या शाही लग्न सोहळ्याप्रमाणेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, शरीरसौष्ठत्व स्पर्धा तसेच लहान मुलांच्या खेळांचे आयोजन केले होते. या वाढदिवसाला राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी रेयांशच्या पाहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी त्याला हेलिकॉप्टमधून आणण्यात आले होते. त्यावेळी देखील मोठा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुलाच्या वाढदिवासानिमित्त गौतमी पाटीलचा शो
सध्या डान्सर गौतमी पाटीलचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. आपल्या अदाकारीने लहानांपासूने थोरांपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांना गौतमीने भुरळ घातली आहे. इतक्या कमी वेळात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवलेल्या गौतमीला पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे तिच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
साताऱ्यात एका पित्याने मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साताऱ्याच्या खोजेवाडी या गावातील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान गौतमीचा शो पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.