Maharashtra Politics : टी 20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियातील चार क्रिकेटपटूंचा विधानभवनात (VidhanBhavan) जंगी सत्कार करण्यात आला. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या महाराष्ट्राच्या चार क्रिकेटपटूंचा सरकारच्या वतीनं खास सन्मान करण्यात आला. मात्र यानिमित्तानं विधिमंडळाच्या आवारात MPL अर्थात महाराष्ट्र पॉलिटिक्स लीगचा वेगळाच थरार पाहायला मिळाला. याला निमित्त ठरलं ते विधानभवनाच्या आवारात लावण्यात आलेलं पोस्टर.
पोस्टरवरुन वाद
विश्वविजेत्या संघाच्या स्वागतासाठी विधीमंडळ आवारात पोस्टर लावण्यात आलं. मात्र त्यावर एकाही क्रिकेटपटूचा फोटो नव्हता. झळकत होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. प्रताप सरनाईकांनी लावलेल्या या पोस्टरवर रोहित पवारांनी (Rohit Pawar) आक्षेप घेतला आणि वादाची इनिंग सुरू झाली. पोस्टरवर एकाही खेळाडूंचा फोटो नसल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये टीम इंडियाच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
विरोधकांनी केली टीका
या पोस्टरवरुन विरोधकांनी टीकेची राळ उठवली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी क्रिकेटबद्दल राजकारण केलं जातंय. क्रिकेटर्ससंदर्भात आज अभिनंदनाचा कार्यक्रम ठेवला आहे मात्र त्या पोस्टर्सवरुन त्यांचेच फोटो गायब आहेत. सरकारनं फक्त स्वत:ची प्रसिद्धी यातून केली आहे अशी टीका केली आहे. याला प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिलंय. विरोधी पक्षाच्या पोटात कळा येत आहे. भारतीय टीम विजेती झाली आहे. रोहित पवारांनी फिरून पहाव संपूर्ण जागेवर संघाचे फोटो आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी 2011 साली काय केले. हिंमत होती तर काल पर्यंत स्वागत करा का नाही सांगितले आम्ही पुढाकार घेतला. मुंबईकरांनी क्रिकेट पटूवर विश्वास दाखविला आहे. आम्ही सगळ्यांचे बांधिल आहोत. आम्ही सर्वांच सन्मान करत आहोत. त्यात राजकारण आणू नका असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.
नितेश राणे यांचा टोला
हे कमी झालं म्हणून की काय, आमदार नितेश राणेंनी दुसरा गुगली टाकला. क्रिकेटपटूंच्या बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या फोटोसाठी पळत होते, असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. रोहित पवारांनीही त्यावर स्ट्रेट ड्राईव्हसारखा पलटवार केला.
एखाद्या चांगल्या घटनेतही राजकारण कसं करायचं, याचा धडाच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी घालून दिला आहे. टी20 किंवा आयपीएल इतकाच ड्रामा या एमपीएलमध्येही आहे. त्यासाठी एखादा वर्ल्ड कप ठेवला तर तो महाराष्ट्रातले राजकारणी नक्कीच जिंकतील.