यंदा अर्थसंकल्पाला उशीर होणार?

निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर यंदाचा म्हणजेच २०१२-१३ सालचा रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाला नेहमीपेक्षा काही दिवस उशीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Dec 25, 2011, 08:31 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक  जाहीर केल्यानंतर यंदाचा म्हणजेच २०१२-१३ सालचा रेल्वे आणि  केंद्रीय अर्थसंकल्प सादरीकरणाला नेहमीपेक्षा काही दिवस उशीर  होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाच राज्यातील  निवडणुकांना २८ जानेवारीला प्रारंभ होईल आणि त्याचा शेवट ३  मार्च रोजी होईल. मतमोजणी ४ मार्चला होणार असली तरी ९ मार्च  पर्यंत आचारसंहिता लागु राहिल.

 

यामुळे ९ मार्च पर्यंत सरकारला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. दरवर्षी रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेरीस मांडण्यात येतो. केंद्रीय संकल्पीय अधिवेशन फेब्रवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं. मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी काल गोवा, मणीपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्यातील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करताना आचार संहिता तात्काळ लागु करण्यात आल्याची घोषणा केली. आचार संहितेमुळे सध्या सत्तेत असलेल्या सरकारला मतदारांना कोणत्याही प्रकारच्या नव्या योजना किंवा प्रलोभनं जाहीर करता येणार नाही. निवडणुकाचे वेळापत्रक आणि अर्थसंकल्प सादरीकरणाच्या तारखां संदर्भात विचारलं असता कुरेशी म्हणाले की सरकारला त्याची काळजी घ्यावी लागेल.