सिंघवींच्या बचावासाठी खुर्शीद मैदानात

कथित सीडी वादावर भाजपने अभिषेक मनु सिंघवींकडून संसदेत स्पष्टीकरण मागितल्यावर कायदे मंत्री सलमान खुर्शीद सिंघवींच्या मदतीला धावून आले आहेत. हा मुद्दा संसदेत उपस्थित होणं योग्य नाही. याऐवजी देशातील जनतेच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणं जास्त महत्तवाचं आहे. असं खुर्शीद म्हणाले.

Updated: Apr 24, 2012, 05:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

कथित सीडी वादावर भाजपने अभिषेक मनु सिंघवींकडून संसदेत स्पष्टीकरण मागितल्यावर कायदे मंत्री सलमान खुर्शीद सिंघवींच्या मदतीला धावून आले आहेत. “व्यक्तीच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनामध्ये एक मर्यादा आखली जायला हवी, यात समज आणि समतोल असावा” असं वक्तव्य सलमान खुर्शीद यांनी केलं आहे.

संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना खुर्शीद म्हणाले, एखाद्या नागरिकाच्या व्यक्तिगत जीवनातील प्रकरणाशी संसदीय गोष्टींचा काही संबंध नाही. ज्या गोष्टीत इतरांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे, त्यात इतरांनी अजिबात दखल देऊ नये. जेव्हा सीडी प्रकरणावर त्यांना विचारलं गेलं, तेव्हा खुर्शीद म्हणाले, त्या सीडीच्या सार्वजनिक प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

 

हा मुद्दा संसदेत उपस्थित होणं योग्य नाही. याऐवजी देशातील जनतेच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणं जास्त महत्तवाचं आहे. असं खुर्शीद म्हणाले. यानंतर जेव्हा त्यांना असं विचारलं गेलं की, मग भाजपच्या मंत्र्याना जेव्हा संसदेत अश्लील व्हिडिओ बघताना पकडलं गेलं होतं, तेव्हा तो प्रश्न का काँग्रेसने उचलून धरला होता? यावर सलमान खुर्शीद उत्तरले, की संसदेत कामकाज चालू असताना एखादी व्य्कती जर अश्लील व्हिडिओ पाहत असेल, तर तो मुद्दा वैयक्तिक राहात नाही.

 

दिल्ली हाय कोर्टाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यास निर्बंध घातल्यानंतरही सिंघवी यांची कथित अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. ही सीडी युट्यूब आणि सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकच्या माध्ममातून पोस्ट केली गेली आहे. हा न्यायालयाचा अवमान असून, फेसबुक आणि युट्यूब यासारख्या वेबसाईटनी नियमाचे उल्लंघन केले आहे. ही घटना सायबर क्राईमअंतर्गतही येऊ शकते, अशी काँग्रेस वर्तुळात चर्चा आहे.