संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी सुरूच आहे. सैय्यद अली कादरी या आरोपीला चौधरी यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

Updated: Feb 21, 2012, 01:49 PM IST

www.24taas.com, जळगाव

 

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले भुसावळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांची जेलमध्येही गुंडगिरी सुरूच आहे. सैय्यद अली कादरी या आरोपीला चौधरी यांनी जेलमध्ये मारहाण केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

 

 

६० लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी सहा महिन्यांपासून न्यायलयीन कोठडीत आहेत. तर मारहाण करण्यात आलेला आरोप सैय्यद अली कादरी हा देखील खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जेलमध्ये आहे.चौधरी आणि कादरी कुटुंबियांमध्ये आधीपासूनच वाद आहे. त्यामुळेच संतोष चौधरी यांनी कादरीला मारहाण केली असल्याची चर्चा आहे. या मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीचा अहवाल पोलीस अधिक्षकांना सादर केल्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

सानिया , सय्यद अली यांना भेटण्यासाठी सानियाची आई अफसाना, बहिण रुकसाना हे कारागृहात आले. त्यांची भेट झाली. त्यानंतर सानिया व तिचे वडील हे दोघं चर्चा करीत असतांना कारागृह अधिक्षकांच्या कार्यालयाशेजारीच लिपीकांजवळ संतोष चौधरी हे बसले होते. त्यावेळी सानिया आणि संतोष चौधरींची नजरा नजर झाल्यानंतर याचे रुपांतर शिवीगाळमध्ये झाले. संतोष चौधरी यांनी सानियाचे वडील सय्यद अली यांना मारले असल्याचा आरोप सानियाची आई अफसाना बी यांनी केला आहे. अफसाना बी यांनी पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांना निवेदन दिले .

 

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आर.व्ही.इंगवले यांना चौकशीसाठी कारागृहात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पाठविले.दरम्यान कारागृहात झालेल्या हाणामारीची वाच्यता करु नये म्हणून कारागृह अधिक्षकाने धमकी दिली असल्याची तक्रार सानियाची बहिण दिया काद्री हिने केली आहे.