www.24taas.com, चंद्रपूर
चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या सागवान संशोधन केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या एका रिकाम्या टाकीत बिबट्या अडकला आहे. वन विभागाच्या चमूने लाकडी शिडी टाकून बिबट्याला बाहेर येण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन दिला मात्र तब्बल २ तासांनंतरही बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं नाही.
आता वनविभागाचे अधिकारी बिबट्याला बाहेर काढण्याऐवजी तो स्वतः बाहेर यावा यासाठी शिडी लावून ठाण मांडून बसले आहेत. वन्य जीव विहीरीत पडू नयेत म्हणून वनविभागाने नागरिकांना विहीरींना कठडे उभारण्याचा सल्ला दिला आहे.
मात्र आपल्याच नर्सरीत ८ ते १० फूट खोल टाक्यांना बुजवण्याचं अथवा संरक्षक भिंत उभारण्याचे सौजन्य मात्र दाखवलं नसल्याचंच या घटनेने स्पष्ट झालं आहे.