बोगस व्होटिंग - अजूनही कारवाई नाहीच

नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच आहे.

Updated: Feb 28, 2012, 05:56 PM IST

योगेश खरे, www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच आहे. त्यातच या घोटाळ्याला सरकारी आशीर्वाद असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कारवाई कोण आणि कधी करणार, याची वाट नाशिककर बघत आहेत.

 

निवडणूक आयोगाच्या अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये फोटो, पत्ता आणि वय बदलून नवं ओळखपत्र तयार करता येतं. निवडणूक विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या कन्हैय्या परदेशी यानं हे काम स्वतः केलं आहे. एका प्रभागात त्याला दीडशे बोगस ओळखपत्र तयार करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. या प्रकरणी कन्हैय्यालाल परदेशी यानं पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. निदान माझ्यावर तरी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता त्यानं केली.

 

 

याचसंदर्भात आता काही पराभूत उमेदवारांसह ३२ जणांनी याचिका दाखल केल्या आहेत. बोगस व्होटिंग कार्ड प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पण त्यानंतर कारवाई करायला मात्र कुणीच पुढे येत नाहीय. जिल्हाधिकारी कार्यालयातूनच सात संगणक गायब झाल्यानं या घोटाळ्याला सरकारी आशीर्वाद असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे कारवाई कधी होणार आणि ती कोण करणार, या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळणं गरजेचं आहे.