[caption id="attachment_1183" align="alignleft" width="156" caption="राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे"][/caption]
झी 24 तास वेब टीम, पुणे
काँग्रेसच्या श्रीरंग चव्हाण यांची बंडखोरी, शिवसेनेच्या उमेदवाराची नाट्यमय माघार, भाजपच्या एका गटाकडून उमेदवारावर बहिष्कार आणि राष्ट्रवादीतील मानापानाचे राजकारण या घडामोडीनंतर खडकवासला मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. आता खरी लढत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस बंडखोर यांच्यात होणार आहे.
मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. दिवसभरात वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांनी सकाळी साडेअकरा वाजता शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार सुप्रिया सुळे, महापौर मोहनसिंग राजपाल, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, माजी आमदार कुमार गोसावी, जिल्हाध्यक्ष सुरेश घुले व निरीक्षक दीपक साळुंके त्यांच्या समवेत होते.
भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी दुपारी पाऊणच्या सुमारास अर्ज भरला. भाजपचे प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर, आमदार गिरीष बापट, शहराध्यक्ष विकास मठकरी, शिवसेनच्या जिल्हासंपर्क प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चंदकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आलेले शिवसेनेचे माजी आमदार शरद ढमाले यांनी तापकीर यांना अलिंगन देत अर्ज भरणार नसल्याचे जाहीर केले.
त्यानंतर काँग्रेसचे चव्हाण यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षातील एक गट त्यांच्यासमवेत होता. परंतु अर्ज भरताना त्यातील कोणीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आले नाही. अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण पुणेकरांना ठाऊक असून, ते पुणेकरांना पटणारे नाही. या निवडणुकीत तापकीर हे भाजप-सेना युतीचे उमेदवार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे.
खासदार सुळे यांनी भूमिका मांडताना, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकतेर् एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आहेत. दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून हर्षदाताई काम करतील. माझ्या मतदारसंघात महिलेला संधी मिळाल्याने ताकद वाढेल. हर्षदाताई मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
युतीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना उशिरा आलेल्या शिवसेनेने मात्र, ही निवडणूक एकजुटीने लढणार असल्याचे सांगितले. तापकीर यांच्या पाठीशी ताकद उभी करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. वांजळे, तापकीर आणि चव्हाण यांनी विजयाचा दावा केला आहे. मंगळवारी अर्जांची छाननी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश हदगल यांनी सांगितले. निवडणुकीतील माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.