www.24taas.com, पिंपरी - चिंचवड
ऐन उन्हाळ्यात पिंपरीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना आता त्यांना गॅस टंचाईचाही सामना करावा लागतो आहे. राष्टवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आझम पानसरे हे राज्याच्या ग्राहक कल्याण आणि सल्लागार समितीचे अध्यक्ष असताना ही टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे.
गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केल्यानंतर सर्वसाधारणपणे एका आठवड्यात गॅस सिलेंडर मिळणं अपेक्षित असतं, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये सध्या नागरिकांना कित्येक महिने नोंदणी करूनही गॅस सिलंडर मिळत नाही. त्यामुळे सध्या गॅससाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. मात्र एवढं करूनही गॅस सिलेंडर मिळेलचं याची खात्री नागरिकांना नाही. हे सिलेंडर हॉटेल व्यावसायिकांना पुरवले जात नाहीत ना? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
कोणतं तरी पद मिळावं यासाठी राजीनामा देत अजित पवारांना आव्हान देत कॅबिनेट दर्जाचं ग्राहक कल्याण आणि सल्लागार समितीचं अध्यक्षपद मिळवणारे आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आहेत. असं असतानाही ही टंचाई भेडसावत असताना पानसरे प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या पदावर राहून काय काम करता येऊ शकतात याची कल्पना पानसरेंना आहे की नाही अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.