www.24taas.com, मुंबई
हल्ली आई-वडिल कामानिमित्त बाहेर गेल्यावर एकटी मुलं घरी काय करत असतील, याची पालकांना नेहमीच चिंता असते. पण इंटरनेट आल्यापासून ही चिंता अधिक वाढली आहे. कारण, पालकांच्या परोक्ष मुलं इंटरनेटवर कुठल्या वेबसाइट्स पाहात असतील, अशी धास्ती हल्ली पालकांना वाटू लागली आहे. मात्र लवकरच पालकांचं हे टेन्शन दूर होणार आहे. टीव्हीवरील काही चॅनल्सपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जसं पॅरेंटल कंट्रोल हे सेटिंग असतं, त्याप्रमाणेच नेटसर्फिंग सुरक्षित करण्यासाठीही असे ‘पॅरंटल कंट्रोल’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं आहे.
‘ग्लोबल सिक्युरिटी टेक फर्म मैकरफी’ या संस्थेने देशातल्या १० शहरांमध्ये सर्व्हे केला. यामध्ये त्यांना ६२ टक्के मुले आपली खासगी माहिती ऑनलाइन शेअर करीत असल्याचं आढळून आलं. पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांची ‘ऑनलाइन ऍक्टिव्हिटी’ तपासून पाहू शकत नाहीत. त्यामुळे पालकांच्या वतीनं काम करणारं ‘पॅरंटल कंट्रोल सॉफ्टवेअर’ मुलांच्या सुरक्षित ‘नेटसर्फिंग’साठी फायदेशीर ठरणार आहे. मुलांच्या इंटरनेटवरील हालचाली या सॉफ्टवेअरतर्फे टिपल्या जाऊ शकतात.
अनेक लहान मुलं इंटरनेट हाताळताना नकळतपणे नको ती जोखीम स्वीकारतात. अशा वेळेला हे नवे सॉफ्टवेअर उपयोगाचे ठरू शकते. नेटवर लहान मुलांदेखील कळत नकळत अश्लील छायाचित्रं किंवा कटेंट पाहू शकतात. यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय सायबर क्राइमचीही ते शिकार बनू शकतात. काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या मुलांना ई-मेलद्वारे चॅटिंगद्वारे फसवू शकतात. हे धोके टाळण्यासाठी पॅरेंटल कंट्रोल सॉफ्टवेअर फायदेशीर ठरू शकते.