www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याच्यावर आता पडदा पडल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राजीनाम्याचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधीच संपला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारणार की रद्द करणार याकडे लक्ष लागले. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा चेंडू काँग्रेसच्या दिशेने भिरकावला आहे. शरद पवारांनी राजीनामा स्विकारल्याची माहिती प्रदेशाध्य़क्ष मधुकर पिचड यांनी सकाळी मुंबईत दिली.
काँग्रेसला महाराष्ट्रात आणि केंद्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील, असे शरद पवार यांनी बुधवारी कोलकाता येथे स्षष्ट केले होते. तसेच अजित पवार यांच्याशिवाय पक्षातील कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आम्हाला अस्थैर्य नकोय, तर स्थैर्य हवे आहे, असे पवार म्हणाले होते.
आपल्या पक्षासाठी अजित पवार यांच्या राजीनाम्याचा विषय संपला आहे, पीटीआयने वृत्त दिले आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवारांचा राजीनामा स्वीकारणार का, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काँग्रेसने वेट अॅण्ड वॉचची भूमिका स्विकारली होती. आता काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे लक्ष आहे.