ही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!

प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 3, 2013, 08:33 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय. मेलाघाट खातिमामध्ये दरवर्षी एकेदिवशी जोरजोरानं ढोल-नगारे वाजायला लागतात, लोक नाचतात-गातात आणि एक मोठा विवाह सोहळा-समारंभ इथं पार पडतो. पण, या विवाह सोहळ्यात नवरदेव म्हणून असतं ‘वडाचं झाड’ तर नवरी असते ‘पिंपळाचं झाड’
होय! ही श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा याबद्दल प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत. मेलाघाट खातिमामध्ये या दोन वृक्षांचा विवाह म्हणजे एक आनंदाची बाब असते. एक मोठा समारंभ इथं भरवला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा अविरत सुरू आहे. का? तर त्याच्या अनेक गोष्टी मोठ्या आवडीनं सांगितल्या जातात.
एका वडाच्या झाडाला एका पिंपळाच्या झाडाची फांदीनं लपेटून आपल्यात सामावून घेतलं. गावकऱ्यांनी या घटनेला एका गोष्टीचं रुप देऊन हे दोन्ही झाडं म्हणजे गेल्या जन्मातले एकमेकांपासून दूर झालेले प्रियकर-प्रेयसी आहेत असं मानलं आणि तेव्हापासूनच या झाडांच्या विवाहसोहळ्याच्या प्रथेला सुरुवात झाली. वैदिक पद्धतीनं हा विवाह लावला जातो. दोन्ही वृक्षांना यावेळी पांढऱ्या कपड्यात लपेटलं जातं आणि सजवलं जातं.

एकदा विवाह लावल्यानंतर दरवर्षी हा सोहळा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर गावकरी देतात. या दोन झाडांचा विवाह लावल्यानं गावकऱ्यांच्या पुण्यात वाढ होते आणि दैवी प्रकोपामधून ते वाचतात, असं मानलं जातं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.