www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारत-पाकिस्तान विभाजन झाल्यानंतर युद्धावर अनेक चांगले चित्रपट निर्माण झालेत. हीच परंपरा शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘क्या दिल्ली क्या लाहौर’ या सिनेमानं पुढे नेलीय. सीमेवर शत्रुत्वाच्या वेगवेगळ्या भाव-भावनांना हास्याच्या माळेत गुंफवून या सिनेमानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं निभावलीय, असं म्हणता येईल. अभिनेता विजय राज आणि मनु ऋषि यांचा अभिनयही उल्लेखनीय आहे... यालाच, भन्नाट स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्लेचा तडका लागल्यानं हा सिनेमा प्रेक्षकांनाही भावतो.
सिनेमात अभिनेत्याच्या रुपात विजय राजनं आपल्या अभिनयक्षमतेचं जोरदार प्रदर्शन केलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजय राजनं या सिनेमाचं दिग्दर्शनही केलंय. विजय राजनं खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सोबतच सिनेमाची गतीही कायम राहते. सिनेमाचा शेवटची दमदार आणि बुद्धीचा वापर करून केल्यासारखा वाटतो.
सिनेमाची निर्मीती केलीय करण अरोडानं... सिनेमाचे प्रस्तुतकर्ता गीतकार गुलजार आहेत. हा सिनेमा भारत आणि पाक या दोन्ही देशांतील राजनैतिक गरमा-गरमी आणि न तोडता येणाऱ्या संबंधांवर भाष्य करतो. मुख्य म्हणजे, या सिनेमातून कोणताही संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. जर तुम्हाला अर्थपूर्ण सिनेमा पाहण्याची हौस असेल तर या सिनेमाची स्क्रिप्ट आणि स्क्रिनप्ले तुम्हाला नक्कीच जागेवर खिळवून ठेवू शकेल.
सिनेमात अनेकदा विजय राज आपल्या संवादांतून प्रेक्षकांना गुदगुल्या करण्याचा प्रयत्न करतो. विजय राज आणि मनु ऋषि यांच्याशिवाय राज जुत्शी आणि विश्वजीत प्रधान यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिलाय. संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोअर सिनेमाच्या कथेला अनुरूप आहे. सिनेमात काही तांत्रिक गोष्टींची कमतरता राहिलीय पण सिनेमातील संवाद आणि अभिनय ही कमतरता भरून काढतात.
एकूणच काय तर ‘क्या दिल्ली क्या लाहौर’ हा सिनेमा तुमचं पूरेपूर मनोरंजन करतो. सरळ, सपाट परंतु एका गतीत हा सिनेमा तुम्हाला आकर्षित करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.