नवी दिल्ली : उत्तर उत्तराखंडमधील तेहरी जिल्ह्यात आज सकाळी ढगफुटी झाले. या ढगफुटीमुळे चार जणांचा बळी गेलाय. तर गुजरात आणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तेहरी जिल्ह्यातील नौटर गावाजवळ ढगफुटी झाल्याने भितीचे वातावरण आहे. पावसाचे चार जण बळी गेले आहेत. काही जण वाहून गेल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.
पावसामुळे रुद्रप्रयाग ते तेहरी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. ढगफुटीत दोन घरे वाहून गेलीत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्ये पावसानं थैमान घातलंय. राज्याच्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झालीय. नडियादमध्ये एका पुलाखाली बस अडकून पडल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अहमदाबादमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. जास्त पाऊस असल्यानं शहरातली शाळा-कॉलेजेसही बंद आहेत. तर आसाममधील तीन जिल्ह्यात पुराचे पाणी घुसले आहे. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.