www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या सामाहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी एका स्थानिक न्यायालयात सोमवारी सुरू झाली. पण या सुनावणीसाठी न्यायालयात एकच गर्दी झाल्यानं सगळ्यांचाच गोंधळ उडाला. त्यामुळे आरोपींना न्यायालयात उपस्थित न करता कॅमेऱ्याच्या साहाय्यानं या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश देण्यात आलेत.
यानंतर न्यायालयानं कॅमेऱ्यामधून खटल्याची सुनावणी सुरू करण्याचा आदेश दिला. यावेळीच मीडियालानंही या प्रकरणाबाबतची कोणतीही बातमी विना परवानगी प्रकाशित करू नये, असे आदेशही देण्यात आलेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पहिल्याच दिवशी एवढी गर्दी होती की रीडर्स आणि स्टेनोग्राफरलादेखील जागा मिळणं कठिण झालं. या खटल्याशी संबंधित नसणारे सामान्य लोकांचाही या गर्दीत समावेश होता. आरोपींना दाखल करण्यासाठी तुरुंग अधीक्षकांना सुरक्षितता गरजेची वाटत होती. त्यांनी तशी विनंती न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयानं कॅमेऱ्याच्या साहाय्यानं या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्याचे आदेश दिले.
‘या प्रकरणामध्ये कलम ३२७ लागू करताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची बातमी प्रकाशित करणं न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन ठरेल’ असं मीडियालादेखील दंडाधिकाऱ्यांनी बजावलंय. तसंच आरोपींच्या बाजूनं लढणाऱ्या वकिलांना आरोपीला तिहार जेलमध्ये जाऊन भेटण्याची परवानगी देण्यात आलीय. या वकिलांना आरोपींच्या कुटुंबीयांकडून संपर्क साधण्यात आला होता. आता या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आलीय.
सहापैकी पाच आरोपींवर या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सहावा आरोपीला त्याच्या शाळेच्या दाखल्यानुसार १७ वर्ष आणि सहा महिन्यांचा आहे. त्याला किशोर न्याय बोर्डासमोर हजर केलं जाणार आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, जवळजवळ ४० सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आलेत.