नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे मोदींना लक्ष्य केले आहे. "सामूहिक योगा करण्याचे कारण काय आहे हे मला अद्याप समजलेले नाही? असा सवाल दिग्विजय यांनी केला आहे, अपयश आल्याने ते अशा प्रकारच्या कल्पना आणि क्लृप्त्यां लढवित आहेत‘ असंही दिग्विजय यांनी म्हटलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावामुळे २१ जून हा जागतिक योगादिन म्हणून साजरा केला आहे. २१ जून रोजी राजधानी दिल्लीमध्ये सामूहिक योगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोदी विशेष लक्ष देत असल्याचेही वृत्त आहे.
या पार्श्वभूमीवर दिग्वीजय सिंह यांनी सामूहिकरित्या योगा करण्याचे कारण समजत नसल्याचे म्हटले आहे. वेगवेगळ्या ट्विटसमध्ये सिंह यांनी टीका केली आहे.
"जे मोदींना विरोध करतात त्यांनी पाकिस्तानात जा' या भाजप नेते गिरीराज सिंह यांच्या वक्तव्याचा तसेच "ज्यांना योगाला पाठिंबा द्यायचा नाही त्यांनी देश सोडावा‘ या भाजप खासदार स्वामी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचाही दिग्विजय सिंह यांनी उल्लेख केला आहे.
"भारतीय जनता पक्षाचा आणि मोदींचा "सब का साथ सब का विकास‘ चा हाच अर्थ आहे का? हे सारे मोदींच्या प्रोत्साहनामुळे होत आहे आणि याबाबत त्यांचे मौन आहे‘ असेही सिंह यांनी ट्विटद्वारे पुढे म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.