www.24taas.com, झी मीडिया, एरिजोना
काहीजण काहीतरी जगावेगळं करण्यासाठी नेहमी धडपडत असतात. त्यातून विक्रमाला गवसणीही घातली जाते. अमेरिकेतील स्टंटमॅन निक वालेंडा यानेही असाच विक्रम केलाय.
स्टंटमॅन निक यानं ग्रँड कॅनयोन फक्त दोन इंच जाड्या केबल तारेवर चढून पार केले. हा विक्रम निक वालेंडा याने जमिनिपासून १४०० फूट उंचीवर केला, हे विशेष. निकचा हा आगळावेगळा विक्रम पाहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.
रविवारी संध्याकाळी उत्तर – पूर्व एरिजोना जवळील लिटील कोलोरोडो नदीपासून १४०० फूट उंच बांधलेल्या २ इंच रुंद आणि ४०२.३ मीटर लांब असलेल्या स्टीलच्या केबलला पार करण्याचे कर्तृत्त्व त्याने करुन दाखविले आहे. या थरारक स्टंटला डिस्कवरी चॅनलवर जवळजवळ १५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईव्ह पाहिलं. स्टंट करतेवेळी नीकने सुरक्षेचे कोणतेही साधन न घालता फक्त जेससचे नाव घेत तो पुढे चालत राहिला.
विक्रम निक वालेंडाने हा जीवघेणा खेळ २२ मिनिटात पूर्ण केला आणि यासाठी त्याने परमेश्वराला खास धन्यवाद दिले. ३४ वर्षीय निक एक हायवायर आर्टिस्ट आहे आणि तो फ्लाइंग वाँलेंडास, सर्किट घराण्यातला आहे. त्याच्या घराण्यातल्या जवळजवळ सात पिढ्या अशाप्रकारचे स्टंट करत आले आहेत. ६०० लोक त्याच्या या खेळाला प्रेक्षक वर्ग म्हणून लाभला होता. एक नवाज रेंजर, एक पॅरामेडिकल आणि दोन इतर माणसे जे क्रू चित्रपटाचे सदस्य आहेत, ते याचे निकच्या खेळाचे चित्रिकरण करत होते. तेच याचे प्रसारण डिस्कव्हरी चॅनलवर होत होते.
वर्षभरापूर्वी नियाग्रा फाल्सला यशस्वीरित्या पार करुन सातवा गिनिज रेकाँर्ड बनवल्यानंतर रविवारी त्याने हा स्टंट केला. स्टंट करताना त्याने एक मायक्रोफोन आणि दोन कॅमेरा शरीराला बांधलेले. एक कोलोरोडो नदीला पाहण्यासाठी आणि दुसरा सरळ त्या केबलवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी. या पराक्रमानंतर त्याने सांगितले, पुढच्या वेळी त्याला एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि क्रिस्लर बिल्डिंगमधील अंतर टाईप-रोप वर पार करायचे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.