मुंबई : अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला 'लय भारी' सिनेमाने कोट्यवधी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 'लय भारी' चित्रपटाने शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ३. १० कोटींची विक्रमी कमाई केली.
'टाईमपास' आणि 'दुनियादारी' या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढत पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे.
'एक व्हिलन' चित्रपटातली रितेशची अप्रतिम कामगिरी, त्याला मिळालेले यश आणि पाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा माऊली यामुळे हा चित्रपट सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू आहे.
'लय भारी' चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड यशाबद्दल खूप आनंद झाला असल्याचे रितेश देशमुखने म्हटलंय. लोकांनी घराबाहेर पडून हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे आजच्या दिवसाचा विक्रम हा लोकांनी केलेला आहे, असे मत त्याने व्यक्त केले.
सिनेमंत्र, मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला 'लय भारी' हा चित्रपट पहिल्यांदाच महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून दाखवण्यात आला.
मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाचे दिवसाला १५०० शो दाखवण्यात येणार होते. मात्र, प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोची संख्या वाढवावी लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.