पुणे: सेबीनं निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेबीनं शनिवारी सायंकाळी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, या गुन्ह्यात त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आलंय.
महेश किसन मोतेवार, वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह समृद्ध जीवन फूड्स कंपनीविरुद्ध भादंवि ४२०, १८८, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे यांनी तक्रार केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी सेबीनं कंपनीला गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत 'कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम' द्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसंच ठेवी घेण्यात येत होत्या़
अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी समृद्ध जीवननं घेतलेली नव्हती. त्यामुळं गुंतवणूक थांबविण्याचे आदेश सेबीनं दिले होते. परंतु, तरीही कंपनीनं गुंतवणूक घेणं सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली.
याआधी सेबीनं समृद्ध जीवनला गुंतवणूकदारांची रक्कम तीन महिन्यात परत करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, सेबीचे कोणतेही आदेश न पाळता समृद्ध जीवनने मनमानी कारभार चालूच ठेवला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.