भंडारा (माधव चंदनकर, प्रतिनिधी) : पावसाळ्यात विक एन्ड साजरा करण्याची मजा काही और असते… त्यातही धबधब्याचा अनुभव हवाच... गोंदिया जिल्ह्यात एक धबधबा ब्रिटीशकाळा पासून पर्यटकांना खुणावतोय… हा धबधबा आहे हाजरा फॉल…
इथल्या उंच पहाडा वरून खाली कोसळणाऱ्या धारा तुमचं लक्ष वेधून घेतात… हेच विहंगम दृश्य डोळ्यात सामावून घेण्याकरीता पर्यटक इथं जमतात. गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनाला चार चांद लावणारा हा धबधबा… तब्बल २०० मीटर उंची वरून कोसळणारे पाणी… त्या धबधब्या सोबत फोटो काढण्याची पर्यटकांची धडपड असते.
हाजरा फॉलचा इतिहास
या धबधब्याला गौरवशाली इतिहास आहे… इंग्रजांच्या काळातील बांधण्यात आलेला हा धबधबा आहे… तत्कालीन हाजरा नावाच्या ब्रिटीश इंजिनियरने हा धबधबा तयार केला… या धबधब्याच्या वरच्या बाजूला हावडा-मुंबई रेल्वे मार्गाची मुख्य लाईन आहे… इंग्रजांच्या काळात जेव्हा संपूर्ण देश रेल्वे मार्गाने जोडायची तयारी सुरु होती तेव्हा पासूनचा हा धबधबा… सालेकसा ते दरेकसा दरम्यान एक रेल्वे मार्ग डोंगर फोडून बांधण्यात आला होता… मात्र, जवळच असलेल्या काही नाल्यांचे पाणी त्या बोगद्यात यायचे… हाजरा नावाच्या अभियंत्याने पाण्याचा हा प्रवाह पहाडा वरून खाली सोडला आणि तयार झाला हाजरा फॉल… या ठिकाणी या इंजिनियरची समाधी देखील आहे.
कुठे वसलाय हाजरा फॉल
मुंबई-हावडा मार्गावर सालेकसा स्टेशनवर उतरून रस्ता मार्गानं १० किमी तर गोंदियापासून ५० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. दरेकसा आणि सालेकसाच्या मधोमध जंगलात हा धबधबा वसला आहे. नुकतेच या पर्यटन स्थळाला ‘वर्ग क’चा दर्जा प्राप्त झाला असला तरी सुविधा मात्र काहीच नाहीत… रस्तादेखील कच्चा आहे. या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची गर्दी आणखी वाढणार यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.