www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. 'निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न देखील विचारायचे नाहीत का'? ही कोणती मोघलाई? असा सवालच राज ठाकरे यांनी आयोगाला केला आहे, निवडणूक आयोगाला सुनावताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा 'टार्गेट' केलं आहे.
'उपमुख्यमंत्र्यांनी असे बेजबाबदारपणे आचारसंहिता भंग केली तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही', 'मात्र आम्ही बोललो की सगळ्यांना दिसून येतो', 'जेव्हा आचारसंहिता सुरू होऊन २ तास होत नाही तोवर लगेचच अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केला, पण फक्त माफी मागितल्याने आयोगांने त्यांना सोडून दिलं आणि आम्ही त्यावर भाष्य केलं की आयोग आमच्यावर कारवाई करण्याची भाषा करते'.
म्हणजेच आम्ही साधे प्रश्न देखील निवडणूक आयोगाला विचारू शकत नाही का? असा सवालच राज ठाकरे यांनी आयोगाला केला. त्याचसोबत जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचे निर्णय हे एकाच दिवशी का नाही असा देखील राज यांनी आयोगाला प्रश्न विचारला आहे. आज राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
[jwplayer mediaid="34856"]