गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.

Updated: Jun 23, 2016, 03:29 PM IST
गुरुदास कामत यांचा राजीनामा मागे, काँग्रेसमधील बंड शमले title=

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी निवृती जाहीर करुन आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आज त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमधील बंड शांत करण्यात पक्षाला यश आलेय.

गुरुदास कामत यांना पक्ष श्रेष्ठींकडून डावलण्यात येत होते. तसेच त्यांच्या मताला किंमत मिळत नव्हती. कंटाळून कामत यांनी राजीनामा देत राजकीय निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे कामत समर्थक नाराज झाले होते. त्यांनी आंदोलनही केले होते.
 
मुंबईतील महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच, त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला मोठा हादरा बसला. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली आणि अखेर आज त्यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. सोनिया गांधींकडून गुरुदास कामत यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याने ते समाधानी आहेत.

कामत हे गुजरात, राजस्थान आदी राज्यांच्या प्रभारीपदी कायम राहणार आहेत. पाच वेळा खासदार राहिलेले कामत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली होती. तशा आशयाचे पत्र त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठविले होते. त्याचे काहीही उत्तर न आल्याने ६ जून रोजी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

गुरुदास कामत आणि सध्याचे मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांच्यातील मतभेदही समोर आलेत. मध्यंतरी निरुपम यांना हटविणार असल्याच्या बातम्या होत्या; पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबई भेटीत निरुपम यांना अभय दिले होते. त्यामुळे नाराज झालेले कामत गेल्या काही दिवसांपासून पक्षापासून लांबच होते.