www.24taas.com , झी मीडिया, मुंबई ,
देशातील पहिल्या मोनो रेलला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज हिरवा कंदील दाखवला. वडाळा ते चेंबूर अशी मोनो आज अखेर धावली. त्यामुळे अनेक महिन्यांपासूनची प्रतिक्षा संपली. आता कमी पैशात एसीचा प्रवास मुंबईकरांना घडणार आहे.
वडाळा स्थानकात आज दुपारी दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्र्यांनी मोनोरेलला हिरवा झेंडा दाखविला. त्याच मोनोमधून ते चेंबूरला गेले. या सोहळ्याला नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, मुंबई शहरचे पालकमंत्री जयंत पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, महापौर सुनील प्रभू, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार चंद्रकांत हंडोरे, जगन्नाथ शेट्टी आणि नवाब मलिक आदी उपस्थित होते.
मोनो रेल्वे अखेर मुंबईकरांसाठी सज्ज झाली. या नव्या ट्रेनमुळे मुंबईकरांचा प्रवास कितपत सोपा होणार आहे. कशी आहे हे मोनो रेल्वे. आणि मुख्य म्हणजे मोनोसाठी लोकलसारखीच गर्दी होणार का, एक रिपोर्ट..
मुंबईकरांसाठी मोनोची सवारी सज्ज आहे. गेली अनेक वर्षं जे स्वप्नं होतं ते आता सत्यात उतरले आहे. दि. २ फेब्रुवारी २०१४ पासून मुंबईकर या मोनोमधून फिरायला लागणार आहेत. १ कोटींच्या मुंबई शहराच्या मोनोकडून अनेक अपेक्षा आहेत. मोनोरेलमुळे ट्रेनच्या गर्दीतून सुटका होईल, असा तुमचा जर समज असेल, तर तो मात्र चुकीचा आहे. कारण पुढचे काही महिने फक्त आठ तास धावणार आहे.
सकाळी सात ते दुपारी तीन पर्यंतचीच शिफ्ट सध्या मोनो करणार आहे. त्यामुळे ऑफिसला जाताना मोनोमधून प्रवास करता येईल. पण ऑफिसमधून परतताना मोनोऐवजी लोकलनंच प्रवास करावा लागणार आहे. सकाळी मोनो ट्रेनची फ्रिक्वेन्सी ९ मिनिटाला एक अशी असणार आहे. म्हणजे तासाभरात सहा ते सात मोनो धावणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मोनोला चार डब्बे असणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी मोनोमधून प्रवास करणं जिकीरीचंच ठरणार आहे.
मोनोरेलच्या एका डब्यामध्ये २० प्रवाशांना बसण्याची तर १३० प्रवाशांना उभं राहण्यासाठी जागा आहे. म्हणजेच एका डब्यामधून दीडशे प्रवासी प्रवास करु शकतात. अशा चार डब्ब्यांमध्ये एका वेळी सहाशे प्रवासी प्रवास करु शकतील. ९ मिनिट फ्रिक्वेन्सीनुसार जर एका तासाला सहा ते सात ट्रेन्स धावल्या तर दर तासाला ३६०० प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. एका सर्वेक्षणानुसार दर तासाला ८ हजार प्रवाशांना मोनो रेल्वेची गरज आहे.
या आकड्यांमुळे ट्रेन छोटी आणि गर्दी फार अशीच अवस्था होण्याची चिन्हं सध्या तरी दिसतायत. जरी मोनोमध्ये तुम्ही चढलात तरी बसायला सीट मिळेल याची हमी अजिबात नाही. दीडशे प्रवासी क्षमतेच्या एका डब्यामध्ये बसण्यासाठी फक्त २० सीटस आहेत. म्हणजे एकूण क्षमतेच्या तुलनेत फक्त १५ टक्के जागा बसण्यासाठी उपलब्ध आहे. अशातच गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी सीटस ठेवायच्या म्हटल्या तर सामान्य प्रवाशांना बसण्यासाठी अगदीच कमी सीटस उरणार आहेत.
मोनोच्या या सगळ्या बाजू असल्या तरी एक दिलासादायक बाब म्हणजे मुंबईकर एसी डब्यांमधून प्रवास करू शकणार आहेत. ज्यामुळे प्रदूषणाचा त्रास होणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोनो ट्रेनसुद्धा लोकलसारख्या खचाखच भरायला लागल्या, तर एसीमध्येही मुंबईकरांना घाम फुटेल. त्याचं काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ