मुंबई : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असताना, अशा पीडित महिलांना न्याय कसा मिळणार, हा मोठा प्रश्नच आहे. कारण नवं सरकार आल्यापासून महिला आयोगाला अजून अध्यक्ष किंवा सचिवच मिळालेला नाही. उत्तर महाराष्ट्राच्या सदस्यानं राजीनामा दिला असून, अवघ्या चार सदस्यांवर आयोगाचा कारभार सध्या अवलंबून आहे.
आघाडी सरकारनं महिला आयोग अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी चार वर्षं घालवली. आता युती सरकार त्यासाठी किती वर्षं वाट बघायला लावणार, असा सवाल आता केला जातोय... यासंदर्भात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शाह यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी...
राज्यातल्या महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशा घटना राज्यात घडल्यात.. नगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय. तर नाशिकमध्ये हुंडाबळीची घटना समोर आलीय. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं आत्महत्या केल्याचं समजतंय. तर सोमवारी नागपुरात तडीपार गुंडानं एका १८ वर्षाच्या तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. अशा घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अहमदनगरमध्ये ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यात माजी सरपंचाचाही समावेश आहे. रामनवमी सप्ताहाचा हिशेब मागितल्याचा राग आल्याने लक्ष्मण घुले यांनी आपल्या ३ साथीदारांसोबत पीडित महिलेच्या घरात घुसून पीडित महिलेच्या पतीला आणि मुलाला बेदम मारहाण केली आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पीडीत महिलेवर अत्याचार केला.
यात माजी सरपंच लक्ष्मण घुले, भागवत घुले, शिवाजी शिरसाठ आणि संदीप शिरसाठ या चौघांचा समावेश असून त्यांच्या विरोधात सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच या चौघांपैकी भागवत घुले याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतल्याची माहिती महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
नाशिकमधील प्रतिष्ठित गंगापूर रोड भागात हुंडाबळीची घटना उजेडात आलीय. स्वाती पाटील नावाच्या महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. गेल्या वर्षी लग्न झालेल्या स्वातीच्या वडिलांकडं तीन लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे न दिल्यानंच सासरे निवृत्ती पाटील आणि पती पियुष पाटील यांनी स्वातीचा जीव घेतल्याचा आरोप स्वातीच्या नातेवाईकांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील मूळच्या एरंडोलच्या स्वातीनं आत्महत्या केल्याचा बनाव आता पाटील कुटुंबीय करत असल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. लग्नात दिलेले दागिने आणि हुंड्यात दिलेले आठ लाख रुपयेही परत मिळावे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येतेय. विशेष म्हणजे या महिलेचे सासरे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते असून मोठ्या पदावर काम करतात. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी कुजबूज नाशिकमध्ये सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.