www.24taas.com, अमरावती
अमरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय. `सिंचनाचं पाणी कोणत्याही परिस्थितीत उद्योगांना वापरलं जाऊ नये, जे पाणी वापरात नसेल असे पाणी प्रकल्पांना द्यावे, मात्र जर का इतर पाणी प्रकल्पांना देऊन, जर लोकांना पाणी मिळणार नसेल तर अशा प्रकल्पांना माझा विरोध आहे.` अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलीये. राज यांची उद्या सायन्स स्कोर मैदानात जाहीर सभा होतेय. त्यासाठी शुक्रवारी रात्री ते अमरावतीत दाखल झालेत.
मे 2011 मध्ये इंडियाबुल्सच्या औष्णिक वीज प्रकल्पाला अप्पर वर्धा धरणातून पाणी देण्याचा निर्णय झाला. धरणातून 87 दशलक्ष घनमीटर पाणी या प्रकल्पाला देण्याचा करार कंपनीसोबत करण्यात आला. इतकं पाणी कंपनीला दिल्यामुळे 23 हजार 219 हेक्टर जमिनीचं सिंचन कायमस्वरुपी बंद होणार होतं. याचा 25 हजार शेतक-यांना फटका बसणार होता. त्यामुळे विदर्भ अनुशेष निर्मुलन आणि विकास कमिटीनं याचिका केलीये.
अमरावती जिल्हा हा राज्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष आहे. राज्य सरकारनं पाण्याचा प्राधान्यक्रम बदलूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. पिण्यासाठी, उद्योग आणि शेती हा क्रम बदलून पिण्यासाठी, उद्योग आणि शेती असा क्रम झाला, तरी यापूर्वी झालेले निर्णय कायम ठेवून सरकारनं इंडियाबुल्सच्या या प्रकल्पाला एका अर्थी अभय दिल्याचा आरोप केला जातोय...