www.24taas.com, पुणे
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा, पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर हे प्रवास करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात स्वत: आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला.
‘असंभव’ या सिरीअलमध्ये त्यांची सह-अभिनेत्री असणाऱ्या नीलम शिर्के म्हणाल्या की, आनंद दादा अतिशय हसरे आणि प्रसन्न व्यक्तिमत्व होते. त्यांना कधीच गंभीर होऊन बसलेलं पाहिलं नव्हतं. उलट जास्तीत जास्त वेळ ते कामामध्ये व्यस्त असत. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठीतले बहुतांश कलाकार त्यांना श्रद्धांजली देणअयासाठी हजर होते.
सुनील बर्वे म्हणाले, “तू तिथे मी सारखा सिनेमा आणि असंभव सारखी मालिका आम्ही केली. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा होती. ते सतत बिझी असायचे. त्यांच्यासोबतच्या माझ्य़ा अनेक आठवणी आहेत. ते रात्री फार उशीराही प्रवासाला निघाले नव्हते. वेळेवरच निघाले होते. त्यांचा असा भीषण अपघात झाल्याच्या अजूनही विश्वास बसत नाही.”
संदीप खरे- “या निधनामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबई-पुणे हायवेच नव्हे, तर महाराष्ट्रभरात आम्हाला रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. दळण-वळणाच्या व्यवस्थेतील दुरवस्थेमुळे असे किती बळी गेलेले आम्ही पाहायचं?”
पुष्कर श्रोत्री- या अपघातात तीन निष्पाप बळी गेले आहेत. कधीपर्यंत हे सहन करायचं? प्रशासनाला कधी जाग येणार?
लालन सारंग- मला हे बोलतानाही त्रास होतोय. मला काही सुचतच नाही. मी आज पहिल्यांदाच स्मशानात आले आहे... ते आनंदसाठीच
अशोक शिंदे- आनंद अभ्यंकर, मोहन जोशी आणि मी सगळ्यांनी एकत्रच करीअर सुरू केलं होतं. आनंदचा प्रवास मी जवळून पाहिला होता. तो अत्यंत सकारात्मक माणूस होता. त्याने कधीही निगेटिव्ह गोष्टींचा विचार केला नाही.
‘मला सासू हवी’ सिरीयलमधील आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या सहकलाकार आसावरी जोशी यांना बोलताना रडू आवरत नव्हतं. “आमच्या सिरीयलमधले दोन मोहरे आम्हाला सोडून गेले. हे केवळ सिरीयलचंच नव्हे, तर आमच्या सर्वांचं वैयक्तिक नुकसान झालं आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.