Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या  १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...

| Mar 03, 2024, 21:47 PM IST

12 Jyotirlingas in India : भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या  १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...

1/12

सोमनाथ ज्योतिर्लिंग,गुजरात

महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगमधलं पहिलं तीर्थक्षेत्र म्हणून सोमनाथ मंदिराला ओळखलं जातं. चंद्रदेवाला राजा दक्षकाने श्राप दिला की, तुझं तेज कमी होईल. राजा दक्षकाने दिलेल्या श्रापामुळे चंद्रदेवाने महादेवाची उपासना केली.त्यानंतर प्रसन्न झालेल्या महादेवाने चंद्रदेवाला श्रापमुक्त केलं.तेव्हा या ठिकाणी चंद्रदेवाने शिवपिंडीची स्थापना केली. सोम म्हणजे चंद्र म्हणून या ठिकाणाला सोमेश्वर असं नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. गुजरातच्या वेरावळ समुद्रकिनारी वसलेलं हे मंदिर मनाता ठाव घेतं. हे मंदिर 2000 हजार वर्ष प्राचीन असल्यास सांगितलं जातं. 

2/12

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्रप्रदेश

मल्लिकार्जुन हे कृष्णा नदीकाठी वसलेलं महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिवशंकर हे रागावलेल्या कार्तिकेयाला भेटण्यास इथे आले होते म्हणून या ठिकाणाला मल्लिकार्जुन असं म्हणतात. या मंदिर परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. शैलम पर्वतावर वसलेलं मंदिर म्हणून या ठिकाणाला दक्षिणेतलं कैलास म्हणून ओळखलं जातं. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचा परिसर हा घनदाट जंगलाने वेढलेला असून या ठिकाणी ट्रेकर्स मोठ्या प्रमाणात येत असतात. 

3/12

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर प्रमाणेच उज्जैनच्या महाकालेश्वरला कुंभमेळा भरतो. क्षिप्रा नदीच्या घाटावर असलेलं महाकाल मंदिराचं वैशिष्ट म्हणजे इथं होणारी भस्म आरती. पहाटेच्या वेळी क्षिप्रा नदीच्या घाटावर भस्म आरती केली जाते. हिंदू धर्मात या भस्म आरतीला मोठे महत्त्व दिलं जातं. या भस्म आरतीसाठी भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणाला भेट देतात. 

4/12

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, मध्य प्रदेश

कावेरी आणि नर्मदा संगम होतो त्या ठिकाणी वसलेलं ओंकारेश्वर मंदिर. महादेवाचं हे मंदिर ओम आकारासारखं दिसतं. ओंकारला मोठं धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे या ठिकाणाला ओंकारेश्वर असं म्हटलं जातं. 

5/12

केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड

हिमालयाच्या कुशीत निसर्गसौंदर्याने वेढलेलं केदारनाथ अलकनंदा आणि मंदाकिनी नदीच्या संगमावर आहे. केदारनाथला धार्मिक महत्त्व प्राप्त आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ट्रेकींग करीता जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देतात. 

6/12

भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

 सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पुण्यातील भीमाशंकर हे  देवस्थाला देशातील 12 ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. या ठिकाणी महादेवाची सर्वात मोठी पिंड असल्याने याला मोटेश्वर असंही म्हणतात. हेमाडपंथी शिल्पकलेतील या मंदिराची रचना आहे. 1200 वर्ष जुनं असलेल्या या मंदिरावरील शिल्पकला मोहित करतात. 

7/12

विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश

वाराणसीच्या गंगा किनारी वसलेली काशी हे महादेवाचं निवासस्थान म्हणूनही ओळखलं जातं. विश्वेश्वराच्या मंदिराप्रमाणेच गंगा आरती हे या ठिकाणचं विशेष आकर्षण आहे.

8/12

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

हिंदू पुराणानुसार असं सांगितलं जातं की, गौतम ऋषिंनी गोदावरी नदीच्या किनारी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. गोदावरीच्या किनारी होणाऱ्या कुंभमेळ्याला शिवभक्त आणि तपस्वी मोठ्या भक्ती भावाने येत असतात. 

9/12

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड

रावण हा शिवभक्त म्हणून ही ओळखला जातो. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. रावणाने शिवाला लंकेत येण्याकरीता तपश्चर्या केली. पण काही कारणामुळे महादेवाने इथेच वास्तव्य केलं. त्यामुळेहे ठिकाण महादेवाचं  वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आलं. 

10/12

नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात

नागदेवतांनी उभारलेलं मंदिर म्हणून नागेश्वर. नागांचा ईश्वर अशी महादेवाची ओळख आहे. समुद्र मंथनातून आलेलं विष प्राशन केल्याने महादेवाच्या शरीराची लाही लाही झाली तेव्हा नागराला आपल्या गळ्याभोवती घेणारा देव म्हणून हा नागेश्वर. महादेवाचं हे मंदिर बडोद्याच स्थित आहे.

11/12

रामेश्वर ज्योतिर्लिंग, तामिळनाडू

रावणाच्या लंकेत पाय ठेवण्याआधी महादेवाने तामिळनाडूमध्ये एका शिवलिंगाची स्थापना केली ते ठिकाण रामेश्वर या नावाने उदयास आलं. 

12/12

घृष्‍णेश्‍वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांचे आजोबा यांनी सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला. या मंदिराची सुबक शिल्पकला मन वेधून घेते. महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)