अजिंक्य रहाणे काऊंटीमध्ये, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय

वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टीमकडून खेळणार आहे.

Updated: Apr 25, 2019, 10:34 PM IST
अजिंक्य रहाणे काऊंटीमध्ये, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय title=

मुंबई : वर्ल्ड कप टीममध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टीमकडून खेळणार आहे. इंग्लंडमधला काऊंटी क्लब हॅम्पशायरने अजिंक्य रहाणेशी करार केला आहे. हॅम्पशायरकडून खेळणारा रहाणे हा पहिला भारतीय खेळाडू आहे. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर रहाणेने हॅम्पशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला. व्हिजा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर रहाणे मे, जून आणि जुलैच्या सुरुवातीला काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल.

'हॅम्पशायरकडून खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. काऊंटीमध्ये खेळताना मोठ्याप्रमाणावर रन करून टीमला जिंकवून देण्याचा माझा मानस आहे. काऊंटी खेळण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे', अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम याचा बदली खेळाडू म्हणून रहाणे हॅम्पशायरकडून खेळेल. मार्करम याची वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये निवड झाली आहे. त्यामुळे त्याला हॅम्पशायरची टीम सोडावी लागणार आहे. अजिंक्य रहाणेला टीममध्ये घेतल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असं हॅम्पशायरचे संचालक जाईल्स व्हाईट म्हणाले.

अजिंक्य रहाणेची काऊंटीमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. पण हॅम्पशायरचं घरचं मैदान असलेल्या एजेस बाऊलमध्ये भारताकडून खेळताना रहाणेचं रेकॉर्ड चांगलं आहे. चार टेस्ट इनिंगपैकी तीन इनिंगमध्ये रहाणेने अर्धशतक केलं आहे. तर २०११ साली वनडेमध्येही त्याने अर्धशतक केलं होतं. इंग्लंडमध्ये रहाणेची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी ३० च्या खाली आहे. इंग्लंडमध्ये रहाणेला एकमेव टेस्ट शतक झळकावता आलं आहे. २०१४ साली लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये रहाणेने शतक केलं होतं. 

अजिंक्य रहाणेने ५६ टेस्ट मॅचमध्ये ४०.५५ च्या सरासरीने ३,४८८ रन केले आहेत. यामध्ये ९ शतकं आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.