दुबई : आयपीएल 2020 मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला 69 धावांनी पराभूत केले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी झाली. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने 52 आणि इंग्लंडच्या बेअरस्टोने 97 धावा केल्या. सामना संपल्यानंतर वॉर्नर म्हणाला की, 'मी आणि बेअरस्टो एकत्र मजेदारपणे फलंदाजी करतो.'
वॉर्नर म्हणाला की, '2 देशात (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) द्वेष आहे असे लोकांना का वाटते हे मला समजत नाही. मी त्याला फक्त स्ट्राईक देत होतो. आम्ही दोघेही एकत्र फलंदाजीचा आनंद घेत होतो.
तो म्हणाला की, 'आम्ही गोलंदाजांवर अटॅक करण्याचा विचार केला होता आणि ते केलं. आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगले खेळलो. राजस्थानविरुद्ध आम्हाला एक आव्हानात्मक सामना खेळायचा आहे. आशा आहे की आम्ही पुन्हा २०० धावा करू शकू.'
जोपर्यंत निकोलस पूरन पंजाबकडून फलंदाजी करीत होता, तोपर्यंत त्यांच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या, परंतु राशिद खानने पुरनला आऊट करताच हैदराबादचा विजय केवळ औपचारिकता होता.
तो पुढे म्हणाला की, 'जेव्हा निकोलस फलंदाजी करीत होता तेव्हा मी थोडा घाबरलो होतो. मी बांगलादेशात त्यांच्याबरोबर खेळलो आहे आणि जेव्हा तो शॉट्स खेळतो तेव्हा तो खूप क्लीन असतो. राशिदने उत्तम काम केले. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याचं संघात असणे शानदार आहे.'