IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये (IPL 2025) एन्ट्री झाली आहे. राहुल द्रविड कोलकाता नाईट रायडर्स किंवा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रशिक्षकपदाची जबाबादारी सांभाळणार अशी चर्चा होती. पण राहुल द्रविड (Rahul Dravid) राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) जोडले गेले आहेत. राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविड यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची कमान श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराच्या हाती होती. 2021 मध्ये संगकारा राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता. आता संगकारा आता कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि SA 20 लीगमध्ये राजस्थानच्या फ्रँचाईजीचं काम सांभाळणार आहे.
द्रविडने सुरु केलं काम
राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचाईजीबरोबर करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार फ्रँचाईजीबरोबर करार झाल्यानंतर राहुल द्रविड यांनी लगेच आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. आयपीएल 2025 हंगामाआधी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल द्रविड यांनी रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंच्या यादीवर काम सुरु केलं आहे.
द्रविडची आयपीएल कारकिर्द
राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं नातं जुनं आहे. आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2014 आणि 2015 मध्ये राजस्थानचे मेंटोर म्हणून काम केलं. 2016 मध्ये द्रविडने दिल्ली डेअरडेव्हिलशी करार केला. त्यानंतर 2019 मध्ये राहुल द्रविडने बंगळुरुमधल्या नॅशनल क्रिकेट अकादमीच्या हेडची जबाबादीर सांभाळली. तर 2021 मध्ये राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने WTC अंतिम फेरी 2021 आणि 2023, एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम फेरीत धडक मारली. तर 2024 मध्ये टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपला गवसणी घातली.
विक्रम राठोड सहाय्यक प्रशिक्षक
रिपोर्टनुसार टीम इंडियाचे माजी बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांची राजस्थान रॉयल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाऊ शकते. विक्रम राठोड यांनी भारतीय संघाचे सिलेक्टर म्हणूनही काम केलं आहे. नॅशनल क्रिकेट अकॅडमीतही विक्रम राठोड यांनी राहुल द्रविड यांच्याबरोबर काम केलं आहे. 2019 मध्ये बीसीसीआयने विक्रम राठोड यांनी टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाजी जबाबदारी सोपवली. टी20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत ते या पदावर होते.