गोल्डकोस्ट : भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गोल्ड कोस्ट सेंटरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेल्सने भारताला ३-२ असे पराभूत केले. हॉकी इतिहासातील वेल्सने भारतावर मिळवलेला हा पहिला विजय आहे. भारतीय संघाला या सामन्यात १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्यापैकी केवळ एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला यश आले.
वेल्सने सामन्यातील सुरुवातीपासूनच भारतावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली होती. अवघ्या सातव्या मिनिटात वेल्सने पहिला गोल करत आघाडी मिळवली. हा गोल वेल्सच्या सियान फ्रेंचने केला. तिने डाव्या बाजूने स्वीप शॉट घेत गोलकीपर सविता सिंहला चकवत गोलपोस्टमध्ये धाडला.
भारताने सातव्या मिनिटांनंतर काऊंटर अॅटॅक करण्यास सुरुवात केली आणि नवव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र गुरजीत या पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करु शकली नाही. पहिल्या हाफमध्ये भारताला दोन आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्याचे गोल होऊ शकले नाहीत.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये वेल्सला १८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारताचा डिफेन्स मजबूत असल्यामुळे वेल्सचा गोल होऊ शकला नाही. यानंतर २६व्या मिनिटाला पुन्हा वेल्सला पेनल्टी मिळाली. यावेळी वेल्सने ही संधी वाया जाऊ दिली नाही. सियान फ्रेंचने वेल्सला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्स २-०ने आघाडीवर होते. ३४व्या मिनिटाला भारताने पहिला गोल केला. त्यानंतर ४१व्या मिनिटाला निकी प्रधानने दुसरा गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. दोन्ही संघांचा डिफेन्स मजबूत होता. यादरम्यानच ५७व्या मिनिटाला वेल्सला गोल करण्याची संधी मिळाली आणि भारताला ३-२ असे पराभूत व्हावे लागले.