World Cup 2023 News: रविवारी रात्री तमाम भारतीय चाहत्यांच्या स्वप्नाचा एका क्षणात चुराडा झाला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाचा 6 विकेट्सने पराभव केला. या पराभवामुळे वर्ल्डकप जिंकण्याच्या आशेवर असलेल्या सर्व चाहत्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. या स्पर्धेत फायनलपूर्वी अजिंक्य असलेली टीम इंडिया फायनलमध्येच कशी पराभूत झाली हाच प्रश्न सर्वाच्या मनात होता. दरम्यान या पराभवानंतर आता रोहित शर्माची टीम इंडियाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केली जाणार अशी चर्चा रंगली आहे.
टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न होतं. यावेळी विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने रोहित शर्मा मोटेरा स्टेडियममधून बाहेर पडताना त्याच्याजवळून जाणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करत होता तेव्हा त्याचे डोळे पाणावले होते. रोहित शर्माच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला असं वाटत असलं तरी, टीम इंडियाला अजूनही त्याची गरज आहे आणि त्याला किमान दोन वर्ष कर्णधार म्हणून ठेवावं लागणार आहे.
2007 मध्ये राहुल द्रविडच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ जेव्हा संपला तेव्हा महेंद्र सिंग धोनीने त्याची जागा घेतली आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळली. यावेळी धोनीने जेव्हा कर्णधारपद सोडलं त्यावेळी विराट कोहली पर्याय म्हणून उपलब्ध होता. त्याचप्रमाणे विराटनंतर रोहित शर्मा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार होता.
मात्र आता रोहितनंतर कोणताही युवा फलंदाज कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत टीम सिलेक्टर्सकडे कर्णधार म्हणून रोहित शर्माशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये.
वर्ल्डरकपमध्ये झालेल्या पराभवानंतर टीमचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं. यावेळी यांच्या बोलण्यातून रोहित टीमसाठी किती महत्त्वाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आलं. सामना संपल्यानंतर राहुल द्रविड म्हणाले, 'रोहितने या टीमचे नेतृत्व खूप चांगलं केलं आहे. त्याने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या सहकारी खेळाडूंना आपला बराच वेळ आणि उर्जा दिली आहे. कोणत्याही चर्चेसाठी आणि बैठकीसाठी तो नेहमी उपलब्ध असतो.
वनडे सामन्यांमध्ये रोहितला कोणती सिरीज खेळायची आहे आणि कोणती नाही हे तो ठरवू शकतो. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये कोविडनंतर, तो सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे आणि टीमला सध्या त्याची गरज आहे. रोहितच्या उपस्थितीत पुढचा कर्णधार तयार करता येईल, जेणेकरून आगामी काळात टीम चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकणार आहे.