Ind v Eng: सूर्या, शमीचं कमबॅक! आजपासून सुरु होणाऱ्या T20 मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार? Playing XI कशी?

India vs England When And Where To Watch Probable Playing XI: भारत आणि इंग्लडदरम्यानच्या पाच टी-20 सामन्यांपैकी पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 08:56 AM IST
Ind v Eng: सूर्या, शमीचं कमबॅक! आजपासून सुरु होणाऱ्या T20 मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार? Playing XI कशी? title=
आजपासून सुरु होणार मालिका

India vs England When And Where To Watch Probable Playing XI: भारत आणि इंग्लंडदरम्यान आजपासून टी-20 मालिका सुरु होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकात्यामधील इडन गार्डन्सच्या मैदानावर सायंकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. हा सामना कोणत्या चॅनेलवर अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येणार आहे तसेच संभाव्य प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे पाहूयात...

सूर्या आणि शमीचं कमबॅक

आजच्या सामन्यामध्ये भारताचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून जवळपास दोन महिन्यानंतर सूर्या मैदानात दिसणार आहे. यापूर्वी सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत दिसला होता. ही मालिका भारताने त्याच्या नेतृत्वाखाली 3-1 असी जिंकली होती. या सामन्याच्या माध्यमातून एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये नोव्हेंबर 2023 रोजी अंतिम सामना खेळलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसुद्धा पुन्हा मैदानात दिसणार आहे. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाबरोबर गोलंदाजीची धुरा शमीच्या खांद्यावर असणार आहे.

फिरकीची जबाबदारी कोणावर?

फिरकी गोलंदाजांमध्ये भारताचा उपकर्णधार अक्षर पटेलला रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांची साथ असेल. तर संजू सॅमसन आणि यश जुरैल या दोघांपैकी एक विकेटकीपर आजच्या सामन्यात पाहायला मिळणार आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आलं आहे. 

पाहुणा संघ कसा आहे?

इंग्लंडच्या संघाचं नेतृत्व जोस बटलर करणार आहे. बटलरबरोबरच पाहुण्या संघात हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडसारखे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच मागील वर्षी इंग्लंडकडून खेळताना सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या इंग्लीश खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानी राहण्याचा मान मिळवलेल्या जेकब बेथेलवर विशेष लक्ष असणार आहे. आपल्या सात टी-20 सामन्यांमध्ये जेकब बेथेलने दोन अर्थशतकं झळकावली आहेत. 

कुठे पाहता येणार हा सामना?

कोलकात्यामधील ईडन गार्ड्न्सवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्याचा टॉस संध्याकाळी साडेसहा वाजता खेळवला जाणार आहे. प्रत्यक्ष खेळाला सायंकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन भारतात लाइव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. तर डिस्ने प्लस हॉटस्टारच्या अॅप्लिकेशनवरुन आणि वेबसाईटवरुनही सामना लाइव्ह पाहता येणार आहे. 

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कॅप्टन), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, रिंकू सिंग, अक्षर पटेल/ वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/ रवी बिश्नोई