India VS Pakistan : भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा खेळाच्या मैदानावर आमने सामने येतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष या हायव्होटेज सामन्याकडे लागलेलं असतं. त्यामुळे चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. आता चीनमध्ये सुरु असलेल्या आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. तब्बल 350 दिवसांनी आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारत पाकिस्तान भिडणार असून दोन्ही संघांमध्ये गेल्यावर्षी 30 सप्टेंबर 2023 रोजी सामना खेळवला गेला होता.
टीम इंडियाने सुरु असलेल्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये 4 सामने जिंकून 12 पॉईंट्स मिळवले आहेत. यासह टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर आहे. तर पाकिस्तानने आतपर्यंत स्पर्धेत एकूण 3 सामने खेळले असून यापैकी 2 सामने ड्रॉ झाले तर एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला. यामुळे पाकिस्तान सध्या 5 पॉईंट्स मिळवून पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आता या टॉप 2 टीम सेमी फायनलपूर्वी शनिवार 14 सप्टेंबर रोजी ग्रुप सामन्यात खेळतील.
हॉकीच्या इतिहासात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 180 सामने खेळवण्यात आले असून यात आतापर्यंत पाकिस्तानने 82 तर भारताने 66 सामने जिंकले आहेत. तर 32 सामने ड्रॉ झाले. तर मागील 11 वर्षांमध्ये म्हणजेच 2013 नंतर पाकिस्तानवर भारतीय संघ भारी पडताना दिसला. यादरम्यान 25 पैकी 16 सामने भारताने जिंकले तर फक्त 5 सामन्यात भारताने विजय मिळवला आणि 4 सामने ड्रॉ झाले. एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. या स्पर्धेत दोन संघांमध्ये 11 सामने खेळण्यात आले असून 7 सामन्यांमध्ये भारताने तर दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला. तर दोन सामने ड्रॉ झाले. गेल्यावर्षी या स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 10-2 ने मात केली होती.
आशिया चॅम्पियनशिपमध्ये होणार भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनल वर दाखवलं जाईल. तसेच सोनी लिव्ह अँपवर लाइव स्ट्रीमिंग सुद्धा पाहता येईल.