ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी आज झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात भारताचा विजय झालाय. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ४५ धावांनी विजय मिळवलाय.
सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र भारताच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. न्यूझीलंडला ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही.
न्यूझीलंडने ३८.४ षटके खेळताना सर्वबाद १८९ धावा केल्या. न्यूझीलंडच्या ल्युके राँचीने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर जेम्स नीशामने नाबाद ४६ धावा केल्या.
न्यूझीलंडचे हे आव्हान भारतासाठी काही तितकेसे मोठे नव्हते. भारताने २६ षटकांत तीन बाद १२९ धावा केल्या. मात्र त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरुच राहिल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने नाबाद ५२ धावा तडकावल्या.