भारतीय क्रिकेट संघाने घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळण्याआधी काही दिग्गज खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीतील काही सामने सराव म्हणून खेळावेत अशी निवड समितीची इच्छा होती. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरोधीतल मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरण्याआधी त्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत तयारी करावी असं निवड समितीला वाटत होतं. पण भारताच्या दिग्गज खेळाडूंनी 'प्रेरणेचा अभाव' असल्याचं कारण देत खेळण्यास नकार दिला असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
न्यूझीलंड संघाने भारताला 0-3 ने व्हाईटवॉश दिला आहे. खेळाडूंनी योग्य सराव न केल्यानेच भारताचा पराभव झाल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. "त्यांनी नक्कीच सराव करायला हवा. हे फार मोठं अंतर आहे. आपण बांगलादेशचा पराभ केल्याने न्यूझीलंडला अत्यंत सहजपणे पराभूत करु असं वाटत होतं," असं सुनील गावसकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. पुढे ते म्हणाले. "पण नक्कीच न्यूझीलंड संघाकडे भारतात आणि आयपीएलमध्ये खेळाडूंहसह चांगलं आक्रमण होतं. त्यांना भारतीय खेळपट्टी कशी आहे याची कल्पना आहे".
न्यूझीलंड संघाविरोधातील मालिकेत अनेक ज्येष्ठ खेळाडू आपल्या सर्वोत्तमच्या आसपासही नव्हते. भारतीय खेळपट्टीवर ते फार संघर्ष करताना दिसले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडूही मालिकेत चांगली कामगिरी करु शकले नाहीत. मागील 10 डावांमध्ये विराट कोहली फक्त 192 धावा करु शकला. तर रोहित शर्माने फक्त 133 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 2015 मध्ये शेवटची रणजी ट्रॉफी खेळला होता. तर विराट कोहली 2012 मध्ये शेवटचा दिसला होता.
जून महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्डकप खेळल्यानंतर तब्बल एका महिन्यानंतर भारतीय खेळाडू क्रिकेट खेळत होते. सूत्रांच्या माहितीनुसार, निवड समितीने 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत बंगळुरू (एक सामना) आणि अनंतपूर येथे होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी सर्व अव्वल खेळाडूंना कसोटी मालिकेपूर्वी सराव मिळावा यासाठी योजना आखली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि काही महत्त्वाच्या खेळाडूंनी सुरुवातीला होकार दिला होता. पण नंतर काही दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली. या खेळाडूंनी कोणताही सराव न करता बांगलादेस आणि न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिका खेळली.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुलीप ट्रॉफीत (Duleep Trophy) सहभागी झाले नाहीत. यानंतर निवडकर्त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळण्यास होकार देणाऱ्या रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) रिलीज करण्याती तयारी दर्शवली.
शुभमन गिल, सरफराज खान, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर हे कसोटी मालिकांपूर्वी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपैकी होते. यामधील बहुतेकांनी पाच कसोटी सामन्यांमध्ये किमान एक महत्त्वपूर्ण खेळी केली होती. गावसकर यांनी भारतीय खेळाडूंना काय घडलं आहे याचा जास्त अभ्यास करू नये आणि भविष्यासाठी तयारी करावी. आता पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका सुरू होत आहे असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.
"हे आता विसरुन जा इतकंच मला सांगायचं आहे. एक वाईट स्वप्न समजून हे विसरुन जा. ऑस्ट्रेलियावर लक्ष केंद्रीत करा. सराव करा आणि सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचा हेतू मनात ठेवा. मग तुम्ही 1-0, 2-0,2-1 कसंही जिंका. यामुळे भारतीय प्रेक्षकांची नाराजीही दूर होईल," असं ते म्हणाले आहेत.