वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्याआधीच डेंग्यू झाल्याने भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल सध्या संघाबाहेर आहे. यादरम्यान शुभमन गिल पुन्हा संघात सामील होणार की नाही यासंबंधी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी शुभमन गिलला पूर्वकाळजी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर तो चेन्नईतील हॉटेलात परतला असल्याची माहिती दिली आहे. गिल अद्यापही आजाराचा सामना करत असून, अद्यापही चेन्नईत असून रिकव्हर होत आहे.
डेंग्यूमुळे शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिला सामना गमवावा लागला. बीसीसीआयने शुभमन गिल दिल्लीत होणाऱ्या अफगाणिस्तानविरोधातील सामन्यातही शुभमन खेळणार नाही अशी माहिती दिली आहे. त्याला चेन्नईत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.
एका वृत्तात शुभमन गिलला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुन्हा हॉटेलात आणण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याबद्दल विक्रम राठोड यांना विचारण्यात आलं. याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितलं की, "तो आता रिकव्हर होत आहे. हो त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण फक्त पूर्वकाळजी म्हणून त्याला रुग्णालयात नेलं होतं. सध्या त्याला वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेण्यात आलं आहे. तो लवकर बरा होईल अशी आम्हाला आशा आहे. तो सध्या तरी एकदम ठणठणीत वाटत आहे".
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधातील संघच कायम ठेवण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीसाठी ईशान किशन हा सर्वात सक्षम पर्याय असेल. विक्रम राठोड यांनी आपल्या अनुभवी फलंदाजांवर विश्वास व्यक्त केला आहे. आपल्या फलंदाजांना 50 ओव्हर्स फॉरमॅटमध्ये कशाप्रकारे खेळायचं याची जाणीव आहे.
"आमच्याकडे सध्या अनुभवी फलंदाज आहेत. मला वाटत नाही त्यांना काही सांगण्याची गरज आहे. या फॉरमॅटमध्ये नेमकं कसं खेळायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. फलंदाज फार स्थिर आहेत. प्रत्येकाकडे त्याची खेळण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांना ज्याप्रकारे खेळायचं आहे तसं खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं जात आहे. तसंच प्रत्येकाची खेळण्याची वेगळी शैली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आम्ही जे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत ते नक्की मिळवू," असं विक्रम राठोड म्हणाले आहेत.
वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे. दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. भारतीय संघ अफगाणिस्तानचा मोठा पराभव करेल अशी आशा आहे. तसंच या विजयासह वर्ल्ड कपमधील दुसऱ्या विजयाची नोंद करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.