IPL 2025 : आयपीएलमध्ये पदार्पण करताच गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) जेतेपद पटकावलं. त्यावेळी गुजरात संघाचा कर्णधार होता हार्दिक पांड्या. पण पुढच्या हंगामात मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ट्रेड करत मुंबई संघात घेतलं आणि कर्णधारपदाची जबाबदारीही दिली. हार्दिक पांड्यानंतर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या (Shubhaman Gill) गळ्यात पडली. पण 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्सची कामगिरी समाधानकारक झाली नाही. त्यामुळे आता नव्या हंगामात शुभमन गिलच्या कर्णधारपदावर गदा येण्याची शक्यता आहे.
गेल्या हंगामात गुजरात टायटन्सला प्ले ऑफमध्येही स्थान मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे नव्या हंगामात गुजरात फ्रँचाईजीकडून नव्या कर्णधारपदाचा शोध घेतला जात आहे. गुजरात टायटन्सच्या (GT) कर्णधारपदाची धुरा ऑलराऊंडर राशिद खानकडे (Rashid Khan) जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राशिदला रिटेन करणार?
31 ऑक्टोबरपर्यंत सर्व दहा संघांना कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहे याची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे सोपवायची आहे. गुजरात टायटन्स राशिद खानला पहिल्या क्रमांकावर रिटेन करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ नव्या हंगामात राशिद खानला 18 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. राशिद खानकडे अफगाणिस्तानचं नेतृत्व करण्याचा तगडा अनुभव आहे. याच कारणाने गुजरातच्या नेतृत्वाची धुरा राशिदकडे सोपवण्याची शक्यता वाढली आहे.
शुभमन गिलवर कर्णधारपदाचा दबाव
गुजराज टायटन्सच्या पहिल्या हंगामात शुभमन गिलने तब्बल 890 धावा केल्या होत्या. यात तीन शतकांचा समावेश होता. त्याचा अॅव्हरेजही 60 हून अधिका होता. पण कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतर त्याच्यावरचा दबाव वाढलेला दिसला. 2024 च्या हंगामात गिलने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 426 धावा केल्या.
या संघांचे कर्णधार बदलणार
आयपीएलच्या नव्या हंगामात गुजराज टायटन्सच नाही तर दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि कोलकाताना नाईट रायडर्सचा कर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने आपण मेगा ऑक्शनसाठी उपलब्ध असू असं सूचक वक्तव्य केलं होतं. तर लखनऊचा संघ केएल राहुलला रिलीज करण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात कोलकाताला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावरही साशंकता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आयीपएलच्या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव यंदा देशाबाहेर होण्याची शक्यता आहे. यासाठी दुबईतल्या रियादमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक दिग्गज खेळाडू उपलब्ध असण्याची शक्यता आहे.