कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काहींच्या पदरी निराशा आली. मुंबईकर यशस्वी जयस्वालच्या संघर्षमय कारकिर्दीला फळ मिळालं आहे. यशस्वी जयस्वालला राजस्थानने २.४० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी यशस्वी जयस्वालची अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने द्विशतक केलं होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे यशस्वीने हा टप्पा गाठला आहे.
मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या यशस्वी जयस्वालची कहाणी संघर्षमय आहे. यशस्वीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न होतं. भदोहीमध्ये त्याच्या वडिलांचं छोटं दुकान आहे. वडिलांकडे क्रिकेटचं प्रशिक्षण देण्यासाठी पैसे नसल्यामुळे यशस्वी १०-११ वर्षाचा असताना मुंबईत काकाकडे आला. काकाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. अखेर काकांच्या सांगण्यावरून यशस्वीला मुस्लिम युनायटेड क्लबने आपल्या टेंटमध्ये राहण्याची परवानगी दिली. याठिकाणी आणखी काही मुलंही राहत होती.
यशस्वी जयस्वालला वडिल पैसे पाठवत होते, पण त्याला हे पैसे पुरत नव्हते. त्यामुळे त्याने क्रिकेट खेळून उरलेल्या वेळेत काम करायचं ठरवलं. पैसे कमवण्यासाठी यशस्वी पाणी पुरी आणि फळं विकायचा, याच्यातून त्याला थोडेफार पैसे मिळायचे. या पैशातून यशस्वी दिवसाचा खर्च भागवायचा.
काळबादेवी येथील एका डेअरीमध्ये तो रात्री झोपायचा, पण डेअरीमधून त्याला काढून टाकण्यात आलं. 'मी टेंटमध्ये यासाठी गेलो कारण मला डेअरीतून काढून टाकण्यात आलं होतं. संपूर्ण दिवस क्रिकेट खेळ्यानंतर मला आरामाची गरज होती. एक दिवस त्यांनी माझं सामान बाहेर फेकून दिलं. कारण मी त्य़ांची मदत करु शकत नव्हतो', असं यशस्वीने सांगितलं.
तीन वर्ष यशस्वी टेंटमध्ये राहिला. वडील गरज असेल तसे पैसे पाठवत होते. पण यशस्वीला अधिक पैशांची गरज होती म्हणून तो आझाद मैदानमध्ये राम लीला दरम्यान पाणीपुरी आणि फळं विकायचा.
यशस्वीने म्हटलं की, 'रामलीला दरम्यान त्याने चांगले पैसे कमवले. पण माझी अशी इच्छा नव्हती की माझ्या सहकाऱ्यांनी पाणीपुरी खाण्यासाठी माझ्याकडे यावं'. यशस्वीने उपाशी राहूनही दिवस काढले. प्रत्येक दिवशी तो मेणबत्तीच्या प्रकाशात जेवायचा. रात्रीच्या वेळी शौचालयात जायचा. यशस्वी मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. लोकल कोच ज्वाला सिंह यांनी जेव्हा त्याला पाहिलं आणि त्यांची ओळख झाली तेव्हापासून त्याने अंडर क्रिकेट खेळणं सुरु केलं.
मुंबई अंडर-१९ चे कोच सतीष सामंत यांनी म्हटलं की, 'तो गोलंदाजांचं डोकं वाचतो... आणि त्यानुसार शॉट खेळतो. अंडर-१९ मध्ये लवकरच त्याने आपली जागा पक्की केली. तो असे शॉट्स खेळतो जो इतर कोणीच खेळू शकत नाही. त्याच्याकडे ना स्मार्टफोन ना व्हॉट्सऍप... इतर सगळे मुलं स्मार्टफोन वापरतात. पण, तो येणाऱ्या काळात मुंबईचा खूप मोठा खेळाडू होऊ शकतो.'