Rohit Sharma: गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाचे चाहते पाहत असलेलं स्वप्न अखेर रोहित शर्माने शनिवारी रात्री पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. मात्र खेळाडू तितकेच खूश देखील होते. अशातच आता रोहित शर्माचा जिंकल्यानंतरचा एक व्हिडीओ आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ट्विट केला आहे. यामध्ये रोहित शर्माने पीचवरील माती चाखून तिला प्रणाम केला आहे.
भारताने टी-20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात सेलिब्रेशन करत होते. मात्र दुसरीकडे रोहित शर्मा पीचवर बसलेला दिसून आला. आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे. म्हणजेच ज्या मातीने त्याला त्याला इतका मोठा विजय मिळवून दिला त्याच मातीला चाखून रोहितने प्रणाम केला आहे. रोहितची मातील वंदन करणारी ही पद्धत फारच अनोखी असून हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड भावूक करणारा आहे.
आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकाचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केला आहे. हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने 7 धावांनी विजय मिळवला. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 176 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकाकडून हेन्रिक क्लासेनने 52 धावांची वादळी खेळी केली. पण हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी आणि सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचने सामना पलटवला. बुमराहच्या गोलंदाजीसमोर साऊथ अफ्रिका चित झाली अन् टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तसेच 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलंय.