Rohit Sharma : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही ५ सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु असून यासाठी टीम इंडिया (Team India) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारताने पर्थ येथे झालेला सीरिजमधील पहिला टेस्ट सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी देखील त्यांची भेट घेतली. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार या नात्याने रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण केलं. सध्या हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
कर्णधार रोहित शर्माने संसदेत भाषणादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या संबंधांवर जोर दिला. त्याने म्हटले की, येत्या काळात आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये चांगले क्रिकेट खेळायचे आहे आणि चाहत्यांनाआनंद द्यायचा आहे. रोहित शर्माने भाषणात म्हटले की, 'भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रीडा आणि व्यवसायात क्षेत्रात दीर्घकालीन संबंध आहेत. आम्ही येथे क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. चाहते आणि खेळाडूंच्या उत्कटतेमुळे ऑस्ट्रेलिया हा एक आव्हानात्मक संघ आहे. जगातील सर्वोत्तम संघाविरुद्ध खेळणे आमच्यासाठी नेहमीच आवडते. आम्ही ऑस्ट्रेलियात यश मिळवले आहे आणि अलीकडेच एक टेस्ट सामना जिंकला देखील जिंकला'.
Canberra
Snippets from TeamIndia visit to the Parliament house ahead of the two-day pink ball match against PM
The Indian Cricket Team was hosted by the Honourable Anthony Albanese MP, Prime Minister of Australia.AUSvIND pic.twitter.com/cnwMSrDtWx
— BCCI (BCCI) November 29, 2024
रोहित शर्माने पुढे म्हटले की, 'आम्हाला हीच गती आता पुढे न्यायची आहे. आम्हालाही आमच्या संस्कृतीचा आनंद घ्यायचा आहे. मला आशा आहे की ऑस्ट्रेलियन आणि भारतीय चाहते उर्वरित सामन्यांचा भरपूर आनंद घेतील. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्यासाठी तसेच दोन्ही देशाला आनंद देण्यासाठी उत्सुक आहोत. ऑस्ट्रेलिया हे एक उत्तम ठिकाण आहे आणि आशा आहे की येत्या काही आठवड्यात आम्ही चांगले क्रिकेट खेळू. येथे येऊन आनंद झाला आणि आम्हाला बोलावल्याबद्दल धन्यवाद'.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सीरिजमधील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित होता. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडिया हा सामना खेळली आणि त्यात विजयी देखील झाली. रोहित शर्मा आता ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून आता पुढील सर्व टेस्ट सामने हे टीम इंडिया रोहितच्याच नेतृत्वात खेळेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार होते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमधील पहिला सामना जिंकल्यामुळे टीम इंडियाला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी आता केवळ 3 सामने जिंकायचे आहेत. जर उर्वरित 3 सामने जिंकण्यात भारताला यश आलं नाही तर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. WTC फायनलची फायनल जून 2025 मध्ये लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.