मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी विशेष असणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भारत अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे टीम इंडियाला ही कसोटी मालिका जिंकणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान दुसरीकडे सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला प्लेइंग इलेव्हन निवडणंही तितकंच कठीण असणार आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर या दोन फलंदाजांच्या फलंदाजांच्या निवडीचा. त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये कोणाची वर्णी लागणार यावर सर्वांचं लक्ष आहे.
टीम इंडिया 4 की 5 गोलंदाजांसोबत मैदानात उतरणार हे पाहायचं आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नाहीत, त्यामुळे पाच गोलंदाजांबाबत साशंकता आहे.
रविचंद्रन अश्विन किंवा शार्दुल ठाकूर किंवा दोघांनाही खेळवायचं की नाही हे आता मॅनेजमेंट ठरवेल. अश्विनने यावर्षी 8 कसोटीत 28.08 च्या सरासरीने 337 रन्स केलेत. तर दुसरीकडे, शार्दुल ठाकूरने इंग्लंडमध्ये दोन आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यांत एक अर्धशतक झळकावून चांगली खेळी केली होती.
अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाची निवड करण्याचा मॅनेजमेंटचा मोठा निर्णय असेल. हे तिन्ही खेळाडू पाचव्या क्रमांकासाठीचे दावेदार आहेत. माजी उपकर्णधार रहाणे गेल्या 12 महिन्यांत त्याच्या खेळाची छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.
रहाणेने यावर्षी 12 कसोटी सामन्यांमध्ये 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. हनुमा विहारीने भारत-अ टीमच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचसोबत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकलं होतं.
केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे/हनुमा विहारी/ श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.