World Cup 2023 Final: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री घेतली आहे. पहिल्या सेमी-फायनलमध्ये भारताने मुंबईतील वानखेडे मैदानावरील सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाला 70 धावांनी पराभूत करुन 2019 च्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला. आधी फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने कमाल केली. भारतीय संघ आता अहमदाबादला रवाना होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. पहिली सेमी-फायलन भारताने जिंकली असली तरी चाहत्यांचं लक्ष दुसऱ्या सेमी-फायनलच्या निकालाकडे लागलं आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये आज म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यातून वर्ल्ड कपचा दुसरा फायनलिस्ट मिळणार आहे. मात्र आता भारतासाठी ऑस्ट्रेलिया हा अधिक सोपा स्पर्धक ठरु शकतो की दक्षिण आफ्रिका याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही संघांविरोधातील भारताची कामगिरी कशी आहे पाहूयात...
सामन्याच्या सुरुवातीला रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं तुफान फलंदाजी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित अर्धशतक होण्याआधीच बाद झाला. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने विक्रमी 50 वं शतक झळकावलं. त्यापाठोपाठ आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं. शुभमन गिल रिटायर हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला पण सामन्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजीसाठी आला. या सर्वांच्या खेळीच्या जोरावर भारताने 4 बाद 397 अशी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवलं नाही आणि 7 चेंडू बाकी असतानाच न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला. कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिचेल यांनी कडवी झुंज दिली. भारत या स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे, हे सुद्धा विशेष.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 13 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियाने या 13 पैकी सामने जिंकले असून केवळ 5 सामन्यांमध्ये भारताला यश आलं आहे. विशेष म्हणजे 2003 च्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी जिंकला होता. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्येच भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन संघाल 199 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हे लक्ष्य 52 बॉल आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. विशेष म्हणजे वर्ल्ड कप सुरु होण्याआधी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्येही भारताने 2-1 ने मालिका जिंकली होती. त्यामुळे वर्ल्ड कपची एकूण आकडेवारी जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असली तर भारताची मागील काही काळातील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं अशक्य नाही.
दक्षिण आफ्रिकेबद्दल बोलायचं झालं तर भारत या संघाविरुद्ध वर्ल्ड करपमध्ये एकूण 6 सामने खेळला आहे. यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यांनी अनेकदा पहिल्यांदा फलंदाजी करताना 350 हून अधिक धावा केल्या आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिकन संघ अव्वल कामगिरी करत आहे. असं असलं तरी दक्षिण आफ्रिकेचा भारताने यंदाच्या वर्ल्ड कपमध्येच दारुण पराभव केला आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारताने आपल्या 50 ओव्हरमध्ये 326 धावा केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 83 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने हा सामना तब्बल 243 धावांनी जिंकला. भारताचा हा दक्षिण आफ्रिकेवरील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक ठरला.