World Cup 2023 India vs New Zealand Semi Final: पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये नशिबानचे पाकिस्तानची साथ दिली नाही. सामन्यातील टॉस हा अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण नेट रन रेटचा विचार करता पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यामधून सेमी-फायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने प्रथम फलंदाजी करणं जास्त फायद्याचं ठरलं असतं. मात्र इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने नाणेफेक जिंकल्यानंतर खेळपट्टीवर हिरवळ अधिक असतानाही प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या 10 ओव्हरमध्येच पाकिस्तानी गोलंदाजीची पिसं काढली. आता पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या जोरावर त्यांना न्यूझीलंडच्या वरचढ होता येणार नाही. त्यामुळे आता भारत आणि चौथ्या स्थानवर असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताचा सामना होणार हे अगदी निश्चित झालं आहे.
पाकिस्तानी संघ सेमी-फायलनमध्ये पात्र ठरण्याची शक्यता अगदी 0.01 टक्के होती. मात्र टॉस जिंकून जॉस बटलरने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेणे आणि त्यानंतर इंग्लडचे सलामीवीर जॉनी बेस्ट्रो आणि डेव्हिड मिलान यांनी केलेल्या तुफानी खेळीमुळे पाकिस्तानचा सेमी-फायनलमधील पत्ता कट झाला आहे. पाकिस्तानने आधी क्षेत्ररक्षण केल्यास त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला पराभूत करणं अशक्य असल्याची चर्चा सामन्याच्या आधीपासूनच होती. आता इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना जो काही स्कोअर करेल ते टार्गेट पाकिस्तानला अशक्य वाटेल अशा रनरेटने पूर्ण करावं लागेल. म्हणजे पहिल्या 10 ओव्हरनंतरची स्थिती पाहिल्यास इंग्लंडने पाकिस्तानला 300 धावांचं टार्गेट दिल्यास ते केवळ 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. हे समीकरण प्रत्यक्षात अशक्य आहे. म्हणजेच पाकिस्तान सामना जिंकला तरी नेट रन रेटच्या दृष्टीने न्यूझीलंडच्या खालीच राहणार आहे.
भारताचा नेदरलॅण्डविरुद्धचा सामना शिल्लक असला तरी तो सामना भारत सहज जिंकेल असं म्हटलं जात आहे. तसेच या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी राहणार असल्याने भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिली सेमी-फायनल होणार हे निश्चित आहे.
अगदी कोणत्याही कारणाने सामना रद्द झाला तरी पाकिस्तान आणि न्यूझीलंडला एक एक गुण वाटून दिला जाईल. असं झालं तरी पाकिस्तान न्यूझीलंडपेक्षा एक स्थान खाली म्हणजे पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहणार आहे. त्यामुळे ते सेमी-फायलनच्या रेसमधून बाहेर आहेत हे निश्चित आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर सेमी-फायनलचा सामना होणार आहे. आतापर्यंतच्या आयसीसीच्या सेमी-फायलन आणि फायलनच्या सामन्यांमध्ये कायमच न्यूझीलंडने भारताला पराभूत केलं आहे. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने तब्बल 21 वर्षानंतर न्यूझीलंडला वर्ल्ड कप स्पर्धेत धूळ चारली आहे. त्यामुळे आता 15 तारखेच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताला हलक्यात घेणं महागात पडू शकतं.
सेमी-फायनलचा दुसरा सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. या दोन्ही सामन्यांमधील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळतील.