World Cup 2023 Virender Sehwag On Team India: भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. विश्वचषक स्पर्धेतील मुख्य सामने सुरु होण्याआधी भारतीय संघासमोर सध्या सर्वात चिंतेची बाब ठरत आहे ती म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज कोण असतील हा प्रश्न. मात्र या प्रश्नाला श्रेयस अय्यरच्या रुपात काही प्रमाणात समाधानकारक उत्तर मिळालं आहे. श्रेयस अय्यरने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खणखणीत शतक झळकावलं. तसेच के. एल. राहुलही मधल्या फळीमध्ये उत्तम खेळत आहे. मात्र भारताने या मालिकेमध्ये ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव कसे खेळतील याची सुद्धा चाचपणी केली. मात्र आता भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने ईशान किशन आणि सूर्य कुमार यादवला मधल्या फळीत खेळवायला नको असं स्फोटक मत व्यक्त केलं आहे. दोघेही मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी अयोग्य आहेत, असं सेहवागने म्हटलं आहे.
"6 व्या आणि 7 व्या क्रमाकांवर के. एल. राहुल आणि हार्दिक पंड्या फलंदाजी करतील. त्यामुळे सूर्यकुमार यादवला इथं संधी मिळणार नाही. पाचवा क्रमांक हा फलंदाजासाठीची आहे. मात्र हार्दिक पंड्या हा सहावा गोलंदाज आहे. त्यामुळे के. एल. राहुल 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो तर 6 व्या क्रमांकावर हार्दिक पंड्या फलंदाजी करेल. ईशान किशन या सर्व सेटअपमध्ये कुठेच फीट बसत नाही," असं सेहवाग म्हणाल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. "श्रेयस अय्यरने शतक झळकावून ईशान किशनला खेळवलं जाण्याची शक्यता कमी आहे. चौथ्या क्रमांकावर कोणाला संधी दिली गेली तर तो अय्यरच असला पाहिजे. त्यामुळेच अय्यर, राहुल आणि पंड्या हे तिघे अनुक्रमे 4,5 आणि 6 या क्रमाकांवर खेळतील," असंही सेहवाग म्हणाला आहे. याच कारणामुळे सुर्यकुमार यादव आणि ईशान किशनला संघात खेळवूच नका असा सल्ला सेहवागने दिला आहे.
"आता सर्व काही यावर अवलंबून आहे की भारतीय संघ कोणतं कॉम्बिनेशन निवडतो. मला वाटतं की हार्दिक पंड्या पूर्ण 10 षटकांची गोलंदाजी करेल कारण तो अतिरिक्त गोलंदाज आहे. त्यामुळे यात सूर्यकुमार फीट बसत नाही. ईशानची निवड केवळ तो डावखरा असल्याने होऊ शकते," असंही सेहवाग म्हणाला.
श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूरमधील सामन्यात दमदार शतक झळकावलं होतं. त्याने 105 धावांची खेळी केली होती. तर राजकोटमध्ये त्याने 48 धावा केलेल्या. के. एल. राहुलने मोहालीमधील एकदिवसीय सामन्यात 58 धावा केलेल्या. इंदूरमध्ये त्याने 52 धावा केल्या होत्या. राहुल आणि अय्यर दोघेही संघात निश्चित खेळतील असं मानले जात आहेत. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, शुभमन गील हे दोघे निश्चित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करेल हे निश्चित आहे.