Mahindra Electric SUV : भारतीय ऑटो क्षेत्र आता अतिशय वेगानं प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करत असतानाच या शर्यतीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनीसुद्धा सहभागी झाली आहे. मागील काही वर्षांपासून महिंद्रानं सातत्यानं ग्राहकांच्या मागण्या आणि भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहून खिशाला परवडतील अशा दरात कार उत्पादनावर भर दिला. ज्यानंतर आता हीच कंपनी कारच्या रेंजमध्ये मोठी अपडेट आणण्यास सज्ज झाली आहे.
26 नोव्हेंबर रोजी महिंद्रा अँड महिंद्राकडून दोन नव्या इलेक्ट्रीक एसयूव्ही XEV 9e आणि BE 6e लाँच करण्यात येणार आहे. या कार लाँच होण्याआधीच कंपनीकडून कारसंदर्भातील काही माहिती सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार या दोन्ही एसयूव्ही कार इलेक्ट्रीक ओरिजिन आर्किटेक्चर INGLO वर आधारित असतील. कारचे हे मॉडेल स्केलेबल आणि मॉड्यूलर असतील. याशिवाय दोन्ही मॉडेल बॅटरी बॅकअपसह लाँच होणार असून त्यामध्ये अनुक्रमे 59kWh आणि 79kWh चं बॅटरी पॅक असणार आहे. ही बॅटरी लिथियम आयर्न फॉस्फेटची असेल. कंपनीच्या माहितीनुसार या कारमध्ये 175kW DC फास्ट चार्जरचा वापर करण्यात आल्यामुळं कारची बॅटरी अवघ्या 20 मिनिटांत 20 टक्क्यांवरून थेट 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते.
कंपनीच्या माहितीनुसार या कार INGLO इंडस्ट्रीच्या वजनानं सर्वात हलक्या फ्लॅट फ्लोअर स्केटबोर्ड स्ट्रक्चर कार असून त्यांना हाय डेन्सिटी बॅटरी तंत्रज्ञानाशी जोडण्य़ात आलं आहे. दोन्ही कारमध्ये कॉम्पॅक्ट थ्री इन वन पॉवरट्रेन सिस्टीम देण्यात येणार असून, मोटर इन्वर्टर आणि ट्रान्समिशनपासून ते तयार करण्यात आलं आहे. इतकी माहिती असतानाही कंपनीनं अद्याप कारच्या ड्रायव्हिंग रेंजसंदर्भात मात्र कोणतीही माहिती दिलेली नाही.
वरील दोन्ही कारमध्ये प्रवासी आणि कारचालकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात येत असून, इंग्लो तंत्रज्ञान यामध्ये बरीच मदत करणार आहे. या कारमध्ये असणारं अल्ट्रा हाय स्ट्रेंथ बोरॉन स्टील आणि रिइंन्फोर्स्ड फ्रंटल स्ट्रक्चर या कारच्या सुरक्षिततेची हमी देतात. कंपनीच्या माहितीनुसार या आर्किटेक्चरमध्ये बॅटरीला गुरुत्वाकर्षणाच्या हिशोबानं लो सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असून, त्यामुळं कारचं संतुलन आणि ती हाताळण्याची पद्धत आणखी उत्तम होते. कारच्या बाह्य भागाला अधिक उष्णता आणि अवघड क्रॅश टेस्ट सहन करण्याच्या हिशोबानंच तयार करण्यात आलं आहे.